नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विविध लोककलाप्रकारांची जुगलबंदी, कवीसंमेलन, आणि मी सह्याद्री बोलतोय या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सादरीकरणाने महासंस्कृती महोत्सवाचा पाचवा आणि अखेरचा दिवस रंगतदार केला.
महासंस्कृती महोत्सवाच्या पाचव्या दिवशी रविवारी पहिल्या सत्रात आदिवासी नृत्य, पावरा नृत्य, शेवंती नृत्य, कांबडा नृत्य, लावणी, लोककला अशा विविध लोककलाप्रकाराना सनई, संभळ वादनाची साथ मिळून रंगतदार जुगलबंदी उपस्थिताना पाहायला मिळाली. वासुदेव विश्वास कांबळे व नंदा पुणेकर, नाशिक या कलाकारांनी हा कार्यक्रम सादर केला. त्यानंतर नाशिक कवी असोसिएशनतर्फे आयोजित कवी संमेलनात सादर केलेल्या कवितांना साहित्यरसिकानी उत्स्फूर्त दाद दिली. शेवटी मी सह्याद्री बोलतो या माध्यमातून शिवराज्याभिषेक सोहळ्याचे सादरीकरण शुअर शॉट इव्हेंट संस्थेने केले. त्याचे सादरकर्ते भूषण देसाई होते.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई व नाशिक जिल्हा प्रशासनाच्या वतीने हा पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सव आयोजित करण्यात आला होता. स्थानिक कलाकाराना व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या लोककलांचे जतन व संवर्धन करण्याच्या हेतूने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून सलग पाच दिवस नाशिककरांना साहित्यिक, सांस्कृतिक, सांगितिक, क्रीडाविषयक मेजवानीचा आस्वाद चाखायला मिळाला.