इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : भावी पिढी घडविणारा, समाजापुढे आदर्श निर्माण करणारी व्यक्ती म्हणून शिक्षकाची प्रतिमा आजही कायम आहे. मात्र, सांगली येथे एका शिक्षकाने दामदुप्पटीचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.
दामदुपट्ट परतावा आणि शेअर मार्केटच्या नावाखाली राज्यात फसवणुकीचा धमाकूळ सुरू असतानाच आता या यादीमध्ये चक्क ज्ञान देण्याचे काम करणाऱ्या शिक्षकाची भर पडली आहे. शेअर मार्केटमध्ये व्यवहारासाठी कंपनी स्थापन करून लोकांची फसवणूक केल्याच्या आरोपातून सांगली जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील ठोंबरेवाडीमधील प्राथमिक उपशिक्षक अनिल केराप्पा लांडगे यांना निलंबित करण्यात आलं आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी ही कारवाई केली. लांडगे यांनी केलेल्या फसवणुकीविरोधात रुपेश दत्तात्रय काळे (रा. कोल्हापूर) यांनी यासंदर्भातील तक्रार सांगली जिल्हा परिषदेकडे केली होती. त्यानंतर या तक्रारीची गंभीर दखल घेत स्थानिक चौकशी अहवाल मागविण्यात आला होता. चौकशी चौकशी समितीने केलेल्या चौकशीनंतर लांडगे याांनी फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. या चौकशी समितीमध्ये कडेगाव खानापूरचे गटशिक्षण अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे शिक्षण विभागातील विस्तार अधिकाऱ्यांच्या समावेश होता.
आर्थिक फसवणूकप्रकरणी नोटीस
शिक्षक अनिल लांडगे यांनी शेअर बाजारात व्यवहार करण्यासाठी पत्नी आणि नितीन शिवाजी कारंडे (रा. आटपाडी) यांच्या मदतीने कंपन्या स्थापन केल्या होत्या. शेअर मार्केट संदर्भात मराठी ट्रेडर्स अॅन्ड फायनान्सियल सोल्यूशन एल. एल. पी., पैशाचे झाड प्रा. लि. कंपनी व पिंटेक्सिम ग्लोबल प्रॉडक्ट्स प्रा. लिमिटेड अशा तीन कंपन्या स्थापन केल्याचे स्पष्ट झाले आहे. अभिजित देशमुख यांनी वकिलाच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक व गैरवर्तनाच्या कारणास्तव नोटीस धाडली आहे.