जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- एखाद्या आईच्या दुधाची समस्या असेल अशा वेळी इतर माताचे दूध डोनेट घेऊन मानवी दूध बँकेद्वारे दिले जाते. अशी सुसज्ज यंत्रणा असलेली सुविधा जळगाव जिल्हा रुग्णालयात जिल्हा वार्षिक योजनेतर्गत नाविन्यपूर्ण योजनेच्या निधीतून बसविण्यात आली आहे.नाशिक विभागातली पहिली अशी ही मदर मिल्क बँक नवजात शिशुंसाठी नवसंजीवनी ठरणार असल्याची भावना जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली.
आज जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात ही ‘मदर मिल्क बँक ‘ पालकमंत्र्यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, बालरोग तज्ञ डॉ. शैलजा चव्हाण, डॉ. मनोज पाटील, रक्त पेढी तज्ञ डॉ. आकाश चौधरी, स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. किरण सोनवणे उपस्थित होते.
दुर्दैवाने अनेक शिशुंना आईचे दूध मिळत नाही.प्रसूतीनंतर अनेक मातांना पुरेसं दूध येत नाही, काहींना उपचारामुळे शिशूना दूध पाजता येत नाही. अशावेळी शिशुंना गाईचे अथवा पावडरचे दूध पाजण्याची वेळ ओढवते. परंतु शिशुंना आईचेच दूध मिळावे या दृष्टीने ह्युमन मिल्क बँक जिल्हा वार्षिक योजनेच्या नावीन्यपूर्ण उपक्रमातून साकारण्यात आल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.
बाळासाठी आईच्या दुधाचं वेगळ महत्त्वं आहे. मात्र बाळाचं पोट भरेल इतकं दूध आईला येतंय हे देखील तेवढंच महत्वाचे आहे. तर पहिल्यांदा आई होणाऱ्या अनेक महिलांना दूध कमी येण्याची समस्या निर्माण होतात. एका अभ्यासातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार 75 महिला प्रसूतीनंतर सुरुवातीच्या काही महिन्यातच बाळाला स्तनपान करणे सोडतात. विशेष म्हणजे आईला दूध कमी आल्यास त्याचे परिणाम बाळाच्या पोषणावर होते. अनेकदा यामुळे बाळाचं पोट भरत नाही. तर भूक लागल्याने बाळ चिडचिड करतात, रडत असतात. त्यामुळेच आईच्या दुधाची बाळाला कमतरता भासू नये हे खूप महत्त्वाचं असल्याचे यावेळी बालरोग तज्ञ डॉ. शैलजा चव्हाण यांनी सांगितले.
पालकमंत्री यांच्याकडून यंत्राची पाहणी
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या मदर बिल्क बँक कार्यन्वित केल्या नंतर मध्ये जाऊन प्रत्येक मशीनची पाहणी करून त्याची कार्यपद्दती बालरोग तज्ञ डॉ. शैलजा चव्हाण यांच्याकडून जाणून घेतली. ही यंत्रणा पहिल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केले.