इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून शिवाजीराव आढळराव पाटील इच्छुक असून, त्यांच्या उमेदवारीविरोधात अगोदर दिलीप मोहिते पाटील यांनी नाराजी व्यक्त केली असताना आता माजी आमदार विलास लांडे यांनीही नाराजी व्यक्त केल्यामुळे अजितदादांजी डोकेदुखी वाढली आहे.
कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी अजित पवार गट शिरुर लोकसभा सोडण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे शिंदे गटाचे माजी खासदार आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार करणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे असतांनाच दिलीप मोहिते पाटील यांनी आढळराव यांनी पूर्वी दिलेला त्रासाचा उल्लेख करून प्रचारात सहभागी न होण्याचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे माजी आमदार विलास लांडे यांनी ही तीच भूमिका घेतल्याने अजित पवार यांची डोकेदुखी वाढली आहे. पवार यांनी शिंदे गटातील आढळरावांना आयात करण्याऐवजी एकतर मला संधी द्यावी अथवा थेट भाजपला जागा सोडावी असे लांडे यांनी म्हटले आहे. यामुळे अजितदादांची बारामती पाठोपाठ शिरूरमध्येही कोंडी होणार आहे.
लांडे म्हणाले, की गेली ३५ वर्ष मी जनतेशी एकनिष्ठ राहिलो आहे. मी २००९ मध्ये लोकसभा निवडणूक लढलो आहे. मी दहा वर्षे आमदार, महापौरही होतो. मी कुठेच कमी पडत नसताना आपल्याच पक्षातील उमेदवाराला उमेदवारी द्यावी, असे त्यांनी म्हटले आहे. आढळरावांना आयात करण्याऐवजी एकतर मला संधी द्यावी, अथवा थेट भाजपला जागा सोडून, महेश लांडगे यांना शिरूर लोकसभेच्या आखाड्यात उतरवावे, अशी मागणी लांडे यांनी केली आहे.
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना पुन्हा खासदार होऊ देणार नाही, असा इशारा अजितदादांना अगोदरच दिला. पण, कोल्हे यांच्याशी लढत देण्याअगोदर त्यांना आधी स्वपक्षीयांची नाराजी दूर करावी लागणार आहे. त्यामुळे त्यांची डोकेदुखी वाढली आहे.