नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुणे येथे नुकत्याच चंद्रशेखर आगाशे महाविद्यालयात अखिल भारतीय आंतर विद्यापीठ महिला खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत यजमान सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे संघात लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय, पंचवटी यांच्या कुमारी कौसल्या पवार आणि मनिषा पडेर या दोन खेळाडूंची संघात निवड करण्यात आली आहे.
२००४ नंतर प्रथमच पुणे विद्यापीठाने पुन्हा एकदा विजेते पदाला गवसणी घातली. अंतीम फेरीत त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या संघाचा एकतर्फी पराभव करून विजेतेपद पटकावले. पुणे विद्यापीठाच्या विजयात नाशिकच्या कौसल्या पवार आणि मनिषा पडेर या दोन खेळाडूंनी मोलाचा वाटा उचलला. सुमारे चार दशकांच्या कालावधी नंतर एकाच वर्षी नाशिकच्या दोन महिला खेळाडूंची पुणे विद्यापीठाच्या संघात निवड झाली आहे.
कौसल्या पवार हिची सलग दुसऱ्या वर्षी पुणे विद्यापीठाच्या संघात निवड झाली आहे. कौसल्या पवार आणि मनिषा पडेर यांना अपूर्व दत्तक योजने अंतर्गत प्रवेश देण्यात आला आहे. कौसल्या आणि मनिषा या दोघी संस्कृती नाशिकच्या खेळाडू आहेत. कौसल्या आणि मनिषा स्व. सौ सुरेखा ताई भोसले निवासी खो खो प्रबोधिनीच्या खेळाडू असून गीतांजली सावळे आणि उमेश आटवणे यांच्या मार्गदर्शनाखाली नियमीत सकाळ आणि संध्याकाळ छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल नाशिक येथे सराव करत असतात. त्यांच्या या यशाचे सर्वांनी अभिनंदन केले.