नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) गेल्या आठवड्यात नाशिक पोलिसांच्या नियंत्रण कक्षात राहुल गांधी यांना बॉम्बने उडवून देऊ, असा धमकीचा फोन आल्यावर पोलिसांनी आरोपीला कसून तपास करत आरोपीला शोधून काढले. त्यानंतर हा धमकीचा फोन करणारा मनोरुग्ण असल्याचे समोर आले आहे. त्याने दारुच्या नशेत हा फोन केल्याचाही उलगडा झाला आहे.
या मनोरुग्णाला आठ-दहा वर्षांपासून दारू पिण्याचे व्यसन आहे. या प्रकरणाचा सर्व अहवाल सुरक्षा एजन्सीजंना पाठवण्यात आला आहे. गृह विभागाने महाराष्ट्र पोलिस आणि दिल्ली पोलिसांना तपास करण्याचे आदेश देण्यात आले असून धमकी किती गंभीर आहे, याचा तपास केला जात आहे. राहुल गांधी यांना झेड प्लस सुरक्षा असून, पोलिस कर्मचाऱ्यांसह ५५ जवान त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असतात.
राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय जोडो’ यात्रेदरम्यान बॉम्ब हल्ला करण्याची धमकी देण्यात आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने राहुल यांच्या निवासस्थान परिसरात पोलिस सुरक्षा वाढवली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने दिल्ली पोलिस, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश पोलिसांना राहुल यांच्या सुरक्षेसाठी काळजी घेण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे.