नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महासंस्कृती महोत्सवाच्या चौथ्या दिवशी मंडळ कलाकारी आहेच, या संस्थेने गजर हरिनामाचा नृत्य नाटिका, यशवंत व्यायाम शाळा, नाशिक तर्फे मल्लखांब प्रात्यक्षिके तसेच कला स्त्री ग्रुप, नाशिक ने आम्ही महाराष्ट्राच्या लेकी व ऊर्जा बँड गीतांच्या कार्यक्रमांचे जोरदार सादरीकरण केले, या तीनही कलाकृतींना प्रेक्षकांनी मनस्वी दाद दिली.
महासंस्कृती महोत्सवाच्या चौथ्या दिवशी मंडळ कलाकारी आहे या नाशिक येथील संस्थेकडून गजर हरिनामाचा या नृत्यनाटिकेने सुरवात झाली. अभिजीत कुरूलकर या पात्राभोवती या नृत्यनाटिकेचे कथानक गुंफले आहे. त्याच्या आयुष्यातील स्वत:च्या आजीचे स्थान, तिच्या आजारपणात तिला भेटण्यासाठी पंढरपूर येथे जाण्याची त्याची तगमग, प्रवासासाठी निघतांना येणाऱ्या अडचणी, वारीसोबत पंढरपूरपर्यंत त्याला घडलेला प्रवास व चंद्रभागेच्या तीरी पोहोचल्यावर विठ्ठलाच्या स्वरूपाची त्याला येणारी प्रचिती व साक्षात होणारे विठ्ठलाचे दर्शन हा सर्व प्रवास व नाटकातील प्रसंग, विठ्ठलाच्या गीतांवरील नृत्ये यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले. यात अभिजीतची प्रमुख भूमिका कल्पेश कुलकर्णी यांनी साकारली. नेपथ्य ऋषिकेश पाटील, पार्श्वसंगीत जय खोरे, रंगभूषा स्वरांजी गुंजाळ तर वेषभूषा खुशी भामरे यांची होती.
यशवंत व्यायाम शाळा, नाशिक तर्फे मल्लखांबाची विविध प्रात्यक्षिके 13 मुली व 12 मुले यांनी सादर केली. यात जिमनॅस्टिक, योगा, विविध आसने, पिरॅमिड असे विविध चित्तथरारक प्रकार विद्यार्थ्यांनी यावेळी सादर केले. मल्लखांबावरील कसरतींमुळे व्यक्तीमध्ये शारीरिक सुदृढता, लवचिकपणा, चपळपणा, संतुलन, साहस इ. गुण वाढीस लागतात. शरीराचे स्नायू पिळदार व बळकट होऊन विशेषतः पाठीच्या कण्याला व्यायाम मिळतो. तसेच यकृत, मूत्रपिंड, प्लीहा इत्यादी अवयवांची कार्यक्षमता वाढते व रक्तभिसरण क्रिया सुधारते. कुस्तीप्रमाणेच जूदो, ॲथ्लेटिक्स, जिम्नॅस्टिक्स, घोडदौड इ. अनेक खेळांत हा व्यायामप्रकार उपयुक्त ठरतो. या मुलांना शिक्षक यशवंत जाधव, ऋषिकेश ठाकुर, पंकज कडलग यांचे मागदर्शन लाभले.
यानंतर आम्ही महाराष्ट्राच्या लेकी कार्यक्रमातून कला स्त्री ग्रुप यांनी मंगळागौरीच्या विविध खेळांचे सादरीकरण केले. यात फुगडी, दंड फुगडी, लाटणे फुगडी, कोंबडापान, गोफ, होडी, गाठोड, भिंड मोडग सई, झुकु लुकु, ओगोटा पागोटा असे विविध खेळांचे प्रकार प्रेक्षकांसमोर सादर केले.
गाणी सर्वांनाच ऐकायला आवडतात. काही गाणी जीवनाचा आधार बनतात तर काही गाणी आपल्याला आपल्या ध्येयाकडे मार्गस्थ करण्यास प्रवृत्त करतात. अशीच काही गाणी ऊर्जा बँडच्या माध्यमातून सा रे ग मा तील विजेता गायक रवींद्र खोमणे, मृण्मयी पाठक व ओंकार भंडारे यांनी सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले व त्यांना साथ देणाऱ्या नयनरम्य नृत्य आविष्काराने प्रेक्षकांची मने जिंकली. या कार्यक्रमात मिलिंद जोशी यांनी निवेदन केले व गायक कलाकारांनी आकाशी झेप घे रे पाखरा, मन सुद्ध तुझ, वाट दिसू दे, हा रंग चढु दे ,कर हर मैदान फतेह, गुरू पौर्णिमा, शूर आम्ही सरदार, वेडात मराठे वीर दौडले, बादल पे पाँव है, विजयी भव, लहेरा दो अशी एकापेक्षा एक सरस गीते सादर केली.
महासंस्कृती महोत्सवाच्या पाचव्या दिवशी रविवार 3 मार्च 2024 रोजी सायंकाळी 4 ते 5.30 या वेळात सनई, संभळ वादन कार्यक्रम, आदिवासी नृत्य, पावरा नृत्य, शेवंती नृत्य, कांबडा नृत्य, लावणी, लोककला अशा विविध लोकप्रकारांचा जुगलबंदी कार्यक्रम होणार असून वासुदेव विश्वास कांबळे व नंदा पुणेकर, नाशिक हे कालाकार हा कार्यक्रम सादर करणार आहेत. सायंकाळी 5.30 ते 6.15 या वेळेत नाशिक कवी असोसिएशन तर्फे कवी संमेलन आयोजित केले आहे. आणि पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सव 2024 या कार्यक्रमाचा समारोप 6.15 ते 7.15 या वेळेत हाईल. यानंतर सांयकाळी 7.15 ते 10 या वेळेत मी सह्याद्री बोलतो- शिवराज्याशिषेक सोहळा चे सादरीकरण शुवर शॉट इव्हेंट संकल्पना व सादरकर्ते भूषण देसाई करतील. महोत्सवासाठी प्रवेश नि:शुल्क असून नागरिकांनी या सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.