नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शाळेच्या वार्षिक सहलीदरम्यान शिक्षकाने बस प्रवासात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलीने घरी येवून कुटूंबियाकडे आपबिती कथन केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात विनयभंगासह, बालकांचे लैगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) व अनुसूचित जाती जमाती (अॅट्रोसिटी) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार भाऊसाहेब सानप असे संशयित शिक्षकाचे नाव आहे. संशयित शहरातील एका नामांकित शाळेत शिक्षक पदावर कार्यरत असून, शाळेची वार्षिक सहल कोकणासाठी गेली होती. गेल्या ५ जानेवारी रोजी रात्री मालवण ते नाशिक विद्यार्थी व शिक्षक बसमधून परतीचा प्रवास करीत असतांना हा प्रकार घडला. अल्पवयीन मुलीच्या आसनावर बसलेल्या संशयित शिक्षकाने खिडकीतून थुंकण्याच्या बहाण्याने हे कृत्य केले आहे.
मुलीने आपल्या कुटूंबियाकडे याबाबत वाच्यता केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून, शाळा प्रशासनाकडून यावर पडदा पाडण्याचा प्रयत्न झाल्याने तब्बल दोन महिने हा गुन्हा दाखल करण्यास उशीर झाला आहे. अधिक तपास निरीक्षक पाटील करीत आहेत.