इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बंगळूरः बंगळूरूच्या रामेश्वरम कॅफेमध्ये शुक्रवारी स्फोट झाला. या स्फोटात सुमारे १० जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. स्फोट झाला तेव्हा कॅफेमध्ये ५०-६० लोक उपस्थित होते. यामध्ये काही लोक उभे राहून जेवायला टोकन घेत होते, तर काही लोक आपल्या कुटुंबीयांसह आणि मित्रांसोबत बसून जेवण करत होते.
या घटनेनंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेचे एक पथक घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू केला आहे. फॉरेन्सिक टीमचे सदस्यही पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत. बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर कर्नाटक सरकारलाही धक्का बसला. उपमुख्यमंत्री डीके शिवकुमारही घाईघाईत घटनास्थळी पोहोचले. सायंकाळी उशिरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आता या घटनेशी संबंधित अनेक महत्त्वाची आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. तपास यंत्रणा तीन मॉड्यूलवर काम करत आहेत. या तिघांपैकी पहिले आयएसआयएसचे बल्लारी मॉड्यूल, दुसरे पीएफआय मॉड्यूल आणि तिसरे लष्कर-ए-तैयबा आहे. कारण या मॉड्यूल्सच्या कार्यपद्धतीशी ब्लास्ट पॅटर्न जुळतो.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एक निवेदन जारी करून याप्रकरणी महत्त्वाची माहिती दिली आहे. एका व्यक्तीने कॅफेमध्ये बॅग सोडल्याचे सांगितले; मात्र हा दहशतवादी हल्ला होता की नाही हे सांगणे कठीण आहे. या संपूर्ण प्रकरणावर राजकारण होता कामा नये, असे ते म्हणाले. या प्रश्नावर विरोधकांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.