मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून राज्यभरातील रुग्णांना मोठी मदत केली जाते. ही रक्कम थेट हॉस्पिटलच्या खात्यात जमा होत असते. मात्र नागपूर येथील आशा हॉस्पिटलने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीलाच रूग्णसेवेसाठी तब्बल पाच लाखांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त करत रुग्णसेवेचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीला अशा प्रकारची देणगी देणारे हे राज्यातील पहिलेच रुग्णालय ठरले आहे.
राज्यभरातील रुग्णांना मदत मिळावी म्हणून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. गेल्या १ वर्ष ८ महिन्यात या कक्षाच्या माध्यमातून राज्यभरातील रुग्णांना तब्बल २०० कोटी रुपयांपेक्षा अधिक मदत करण्यात आली आहे. ऑफलाईन अर्ज स्वीकृतीबरोबरच रुग्णांना मंत्रालयात फेऱ्या मारायला लागू नये म्हणून ऑनलाईन अर्ज स्वीकृती तसेच कक्षाशी टोल फ्री संपर्क साधून तातडीने ही मदत पुरवली जाते. त्यामुळे आरोग्य कक्षाकडे मदतीसाठी येणारा ओघ वाढतच चालला आहे.
ही बाब सर्वांना सुखावणारी आहे. वैद्यकीय सहाय्यता निधी राज्यातील सर्व रुग्णालयांना रुग्ण सेवेसाठी आर्थिक मदत करते. त्यामुळे आपणही या आरोग्ययज्ञ सेवेचा भाग व्हावे म्हणून या आशा हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. राजेंद्र अग्रवाल, डॉ. सौरभ अग्रवाल, डॉ. वेदिका अग्रवाल यांनी स्वतःहून पुढाकार घेत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसाठी तब्बल पाच लाखांचा धनादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्त करत नवा आदर्श घातला आहे.