नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महासंस्कृती महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी नाशिक जिल्हा असोसिएशन तर्फे लतांजली मराठी गीतांचा कार्यक्रम, रूंगठा हायस्कूल, मराठा हायस्कूल व वाघ गुरूजी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी लेझीम,मैदानी खेळ, दांडपट्टा, रिंग व लाठकाठीचे चित्तथरारक सादरीकरण केले तर ह.भ.प. श्रावण अहिरे महाराज, मालेगाव व सहकलाकारांनी कीर्तन सादर केले. या तीनही कार्यक्रमांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
स्वर्गीय लता मंगेशकर यांना आदरांजली म्हणून नाशिक जिल्हा ऑकेस्ट्रा असोसिएशन तर्फे मराठी गीतांच्या लतांजली कार्यक्रमाच्या बहारदार सादरीकरणाने आज महासंस्कृती महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाची सुरवात झाली. या कार्यक्रमात गायिका अर्पणा देशपांडे, अश्विनी सरदेशमुख, अलका अंभोरे यांनी सहकलाकार यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे निवेदन अमर भोळे यांनी केले. वाद्यांची साथ जयंत पाटेकर, प्रशांत महाले, निलेश सोनवणे, फारूख पिरजादे, देवाशिष पाटील, सुधीर सोनवणे, दीपक जगताप, अनोष आढाव यांनी दिली. कार्यक्रमात सादर केलेल्या गीतांमध्ये वादळं वार सुटल ग.., माझ्या सारंगा, राजा सारंगा, असा बेभान हा वारा.., सर्जा चित्रपटातील चिंब पावसानं झालं, संसार चित्रपटातील वारा गाई गाणी.., उंबरठा चित्रपटातील सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या.., कोळीगीत वल्हव रे नाखवा हो.., अखेरचा हा तुला दंडवत.. या सदाबहार गीतांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
यानंतर दुसऱ्या कार्यक्रमात पुष्पावती रूंगठा हायस्कूल, जु. सं. रुंगठा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य, तर मराठा हायस्कूलच्या विद्यार्थिनी पायल भारते, गाथा जाधव शिवकालीन प्राचीन मैदानी खेळ लाठीकाठी व रिंग यांचे सादरीकरण केले. यानंतर वाघ गुरूजी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हलगी ताशाच्या तालावर दांडपट्टा व लाठकाठी चे सादरीकरण केले. या विद्यार्थ्याना नंदन ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्य संजय चव्हाण व शिक्षक श्री. पिंगळे व इतर कलाशिक्षक यावेळी उपस्थित होते. यानंतर ह.भ.प. श्रावण अहिरे महाराज,मालेगाव व सहकलाकारांनी कीर्तनातून रसिकांचे प्रबोधन केले.
महासंस्कृती महोत्सवाच्या चौथ्या दिवशी शनिवार दि. 2 मार्च 2024 रोजी सायंकाळी 4 ते 5 या वेळेत गजर हरिनामाचा नृत्य नाटिकेचे सादरीकरण मंडळ कलाकारी आहेच, संस्था नाशिकद्वारे होणार आहे. सायंकाळी 5 ते 6 या वेळेत यशवंत व्यायाम शाळेतर्फे मल्लखांब प्रात्यक्षिकांचे होईल. आम्ही महाराष्ट्राच्या लेकी हा कार्यक्रम सायंकाळी 6 ते 7 यावेळेत कला स्त्री ग्रुप, नाशिकतर्फे सादर करणार आहे. यानंतर 7 ते 10 या वेळेत संगीतकार मिलींद जोशी, रवींद्र खोमणे (सुर नवा ध्यास नवा विजेता) मृण्मयी फाटक व ओंकार बंडवे हे कलाकार उर्जा बँड गितांचा व नृत्यांचा कार्यक्रम सादर करणार आहेत. महोत्सवासाठी प्रवेश नि:शुल्क असून नागरिकांनी या सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.