नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात १ एप्रिल २०१८ नंतर अस्तित्वात येणार्या नवीन मिळकतींच्या कर योग्य मुल्यात अवास्तव वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव महासभेने फेटाळ्यानंतरही त्याची अंमलबजावणी करणार्या महापालिका प्रशासनाला दणका देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. पालकमंत्री दादा भुसे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी या करवाढीमुळे नाशिकच्या विकासाला खीळ बसणार असल्याचा मुद्दा लक्षात आणून दिल्यानंतर शिंदे यांनी तात्काळ नगरविकास खात्याचे सचिव भुषण गगरानी यांच्यासह प्रमुख अधिकार्यांना पाचारण करीत महापालिकेने महासभेचा ठराव विखंडीत करण्याबाबत पाठवलेला प्रस्ताव फेटाळा व महासभेने करवाढ रद्द केल्याचा प्रस्ताव स्वीकृत करा अशा सुचना दिल्याची माहिती जिल्हाप्रमुख बोरस्ते यांनी दिली.
तसेच हा ठराव मान्य नसेल तर नियमानुसार शासनाकडे विखंडनासाठी पाठवला गेला नाही. प्रशासनाने हा ठराव दफ्तरीदाखल केला असला तरी, मुळात अशा पद्धतीची प्रक्रिया करण्याचे अधिकारच आयुक्तांना नव्हते. त्यामुळे याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. त्यात, सर्व सुनावणी पुर्ण झाली असून केवळ या ठरावाला विखंडनाबाबत शासनाचे म्हणणे बाकी असल्यामुळे करवाढ रद्द करता आलेली नाही. ही बाब लक्षात घेत बोरस्ते यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या घरपट्टी वाढीमुळे नाशिक शहराच्या विकासाला खीळ बसणार आहे. त्यामुळे यासंदर्भामध्ये तात्काळ राज्याच्या नगर विकास व विधी विभागामार्फत उच्च न्यायालयामध्ये नाशिक शहरांमधील अन्यायकारक घरपट्टी रद्द करण्यासाठी प्रतिज्ञापत्र द्यावे तसेच पूर्वलक्षी प्रभावानुसार ज्यांनी अतिरिक्त घरपट्टी भरली त्यांचे समायोजन करावे अशी मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ नगरविकास खात्याला अभ्यास करून कारवाईच्या सुचना दिल्या. पालकमंत्री दादा भुसे यांनी देखील याप्रकरणी तात्काळ नाशिककरांना करवाढीच्या संकटातून मुक्त करा अशा सुचना दिल्या.
करवाढ रद्द करण्याच्या सुचना सद्यस्थितीत नाशिक शहरातील निवासी व अनिवासी अशा दोन्ही क्षेत्रांमधील अवस्तव करवाढीमुळे कोणताही मोठा उद्योग येण्यासाठी तयार नाही तसेच वाणिज्य वापरामध्ये येणारे दुकाने तथा गाळयांचे भाडे देखील परवडण्याजोगे नसल्यामुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ येत आहे. ही बाब लक्षात घेत करवाढ रद्दसाठी मुख्यमंत्र्यांनी नगरविकास खात्याला सुचना दिल्या आहेत.