नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – १० वर्ष, व २० वर्ष नियमित सेवा झालेल्या परंतु पदोन्नतीची संधी उपलब्ध नसलेल्या कर्मचा-यांना आर्थिक लाभाची सुधारीत आश्वासित प्रगती योजना शासनाने लागु केलेली आहे. नाशिक जिल्हा परिषद एकात्मिक बालविकास सेवायोजना अंतर्गत तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ हा नाशिक जिल्ह्यातील एकूण ५९ अंगणवाडी पर्यवेक्षिका यांना देण्यात आला.
यामध्ये २० वर्ष सेवा पुर्ण झालेल्या ४८ अंगणवाडी पर्यवेक्षिका, १२ वर्ष सेवा पूर्ण झालेल्या १ तर १० वर्ष सेवा पूर्ण झालेल्या ८ अंगणवाडी पर्यवेक्षिका यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ हा देण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी साप्रवि रवींद्र परदेशी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी भालचंद्र चव्हाण, जिल्हा समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील, सहायक गट विकास अधिकारी प्रशांत पवार व सदस्य सचिव जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील यांच्या समितीने एकूण ६३ प्रस्तावांची छाननी केली व यातील ४ प्रस्ताव अपात्र झाल्याने एकूण ५९ प्रस्ताव मंजुर करण्यात आले. सदरचा लाभ शासन निर्णय २ मार्च २०१९ अन्वये १० वर्ष, २० वर्ष नियमित सेवेनंतरच्या लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना अंतर्गत लाभ देण्यात आला.
एकूण ५९ अंगणवाडी पर्यवेक्षिका यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळाल्याबददल अंगणवाडी पर्यवेक्षिका संघटनेने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, महिला बाल विकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील व सर्व समितीतील अधिकारी यांचे आभार मानले. या संपूर्ण प्रक्रियेत जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक प्रशासन अधिकारी संजय सोनवणे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी नितिन पवार, वरिष्ठ सहाय्यक उमेश चव्हाण, तसेच सामान्य् प्रशासन विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी रविंद्र आंधळे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी गणेश बगड यांनी परिश्रम घेतले.