नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)च्या कार्यकारी मंडळाची सभा निमा सभागृहात बैठक होऊन त्यात २०२४-२५ साठी पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड झाली. अध्यक्षपदी धनंजय बेळे यांच्या फेरनिवडीची तसेच सचिवपदी आयमाचे माजी अध्यक्ष निखिल पांचाळ यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर सर्व सदस्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे स्वागत केले.
उपाध्यक्षपदी मावळते सचिव राजेंद्र अहिरे यांना बढती मिळाली आहे.त्यांच्याकडे स्मॉलस्केल च्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली तर आशिष नहार यांची मोठे उद्योग गटातून उपाध्यक्षपदी निवड झाली असून त्यांच्याकडे मोठे उद्योग गटाची धुरा सोपविण्यात आली आहे. कोषाध्यक्षपदी जेष्ठ उद्योजक राजेंद्र वडनेरे तर सहसचिवपदी मनीष रावल यांची निवड करण्यात आली.यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
बैठकीस कार्यकारणी सदस्य किशोर राठी,विरल ठक्कर, जयंत जोगळेकर, अखिल राठी, किरण वाजे सुकुमार नायर, रवी शामदसानी,वरूण तलवार,संदीप भदाणे, सतीश कोठारी, सुधीर बडगुजर,कैलास पाटील,नितीन वागस्कर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना सर्व नूतन पदाधिकाऱ्यांनी एकत्रितरित्या काम करून नाशिकच्या उद्योग जगताचे नाव देशपातळी वरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे करण्याकरता निमाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून नाशिकचे औद्योगिक नाव शिखरावर नेण्याचे अभिवचन दिले
निमाला यशोशिखरावर नेणार – बेळे
निमाला यशाच्या नवीन उंचीवर नेण्यासाठी आपण सर्वस्व पणास लावू.नाशकात तसेच जिल्ह्यात मोठ्या गुंतवणुकीचे प्रकल्प यावेत. जिल्ह्यातील भूसंपादन होत असलेल्या जागा लवकरात लवकर उद्योजकांना मिळतील याकरता प्रयत्न राहणार असल्याचे तसेच जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये औद्योगिक वसाहती स्थापन व्हाव्यात तसेच देशाच्या विकासाला हातभार लावणाऱ्या उद्योजकांना त्या प्रमाणात विविध सोयी सवलती, सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत. निर्यातवाढीला प्रोत्साहन देणे तसेच सर्व एमआयडीसी परिसरात शांतता नांदावी आणि कामगारांचे हितही जोपासले जावे यावर आपला विशेष भर राहील. त्यासाठी विविध उपक्रमही राबविले जातील,असे अध्यक्ष बेळे यांनी फेरनिवडीनंतर सत्कारास उत्तर देताना सांगितले.निखिल पांचाळ हे कुशल प्रशासक असून सचिवपदी त्यांची निवड झाल्याने निमाच्या कार्याला आणखी वेग येईल.तसेच इतर सर्व नूतन पदाधिकारी उद्योग क्षेत्रातील दिग्गज असून त्यांच्या समावेशाने निमाला निश्चित नवीन झळाळी प्राप्त होईल, असा विश्वासही बेळे आणि व्यक्त केला.