नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पंचवटी भाजी मार्केट यार्ड भागात दुकानातील साहित्य नोकरानेच चोरून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेत सुमारे ३३ हजाराचा ऐवज नोकराने पळविला असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रशांत अशोक जगताप (५५ रा.निळवंडीरोड,दिंडोरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित नोकराचे नाव आहे. याबाबत योगेश उमाकांत उदार (रा.मखमलाबादरोड) यांनी फिर्याद दिली आहे. उदार यांचे पंचवटी भाजी मार्केट यार्ड भागात सिध्दीविनायक अॅग्री ट्रेंडर्स नावाचे शेती औजारे व साहित्य विक्रीचे दुकान आहे. या दुकानात प्रशांत जगताप हा गेल्या काही दिवसांपासून काम करतो.
गेल्या दोन महिन्यात उदार दुकानात नसल्याची संधी साधत संशयिताने पीएमटी रिटर्न सेट,रिटर्न बॉल,रिटर्न चेंबरचे नग,स्टील सीट,ब्रास बॉल,ब्रास केज असा ३० हजार रूपये किमतीचे साहित्य चोरून नेले. अधिक तपास हवालदार नांदुर्डीकर करीत आहेत.