नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबईच्या वृध्देचा भूखंड बनावट कागदपत्राच्या आधारे परस्पर विक्री करण्याचा प्रयत्न करणा-या विरुध्द गंगापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत भामट्यांनी परस्पर पाच लाखाचे टोकन घेवून भूखंडाचा व्यवहार केला असल्याचे समोर आले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार जयश्री सतीष कोल्हटकर (७८ रा. माटूंगा,मुंबई) या वृध्देने याबाबत फिर्याद दिली आहे. कोल्हटकर यांचा गंगापूर शिवारात सर्व्हे नं. ६५-२ ब मधील प्लॉट नं. ५९ हा भूखंड आहे. या भूखंडाचे देशमुख,सुर्यवंशी व त्यांच्या इतर साथीदारांनी बनावट कागदपत्र तयार करून प्लॉट खरेदी विक्री करण्याचा प्रयत्न केला. बागमार नामक ग्राहकाशी परस्पर व्यवहार करून त्यापोटी पाच लाख रूपयांचे टोकन संबधितांनी स्विकारले.
प्लॉटवर सदर ग्राहकाचे येणे जाणे वाढल्याने कोल्हटकर यांनी चौकशी केली असता परस्पर खरेदी विक्रीचा हा प्रकार समोर आला. त्यामुळे कोल्हटकर यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक नितीन पवार करीत आहेत