नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमीचा विकास करण्यात आला आहे. या मुक्तीभूमीवरील १५ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण रविवार दि.३ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता करण्यात येणार आहे. या विकास कामांचे लोकार्पण नॉर्वे येथील भिक्खू वाटसनपॉन्ग मेडिटेशन सेंटरचे संचालक फ्रा ख्रुसुतमतावाचाई मठी आणि बुद्ध इंटरनॅशनल वेलफेअर मिशन तसेच इंटरनॅशनल बुद्धीस्ट मॉक ट्रेनिंग स्कूलचे संस्थापक सचिव भिक्खू बी.आर्यपल यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमूख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे.
दादरची चैत्यभूमी आणि नागपुरच्या दिक्षाभूमी प्रमाणेच येवल्याच्या मुक्तीभुमीला ऐतिहासिक महत्व आहे. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दि.१३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे धर्मांतराची घोषणा केली होती. त्यामुळे या ऐतिहासिक स्थळाला मुक्तिभूमी म्हणून संबोधण्यात येते. मुक्तीभूमीचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेवून राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी या भूमीचा सर्वांगिण विकास केला आहे.
या मुक्तीभूमीवर यापूर्वी सुमारे १५ कोटी रुपये निधीतून याठिकाणी भगवान गौतम बुद्ध यांची भव्य मूर्ती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा, विश्वभूषण स्तूप व विपश्यना हॉल इ.निर्माण करण्यात आले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या स्थळाला महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘ब’ वर्ग तिर्थ स्थळाचा दर्जा देण्यात आलेला आहे.
आता मुक्तीभूमी टप्पा २ अंतर्गत सुमारे १५ कोटी रुपये निधी खर्च करून विविध विकास कामे करण्यात आली आहे. यामध्ये पाली व संस्कृत अभ्यास केंद्र, सुसज्ज ग्रंथालय, ऑडीओ व्हिज्युअल रूम, आर्ट गॅलरी, अॅम्पीथिएटर, मिटिंग हॉल, भिक्कू पाठशाला, १२ भिक्कू विपश्यना खोली, कर्मचारी निवासस्थान, डायनिंग हॉल, संरक्षण भिंत, अंतर्गत रस्ते व लॅण्डस्केपिंग या कामांचा समावेश आहे. या कामांचे लोकार्पण फ्रा ख्रुसुतमतावाचाई मठी आणि भिक्खू बी.आर्यपल यांच्या हस्ते तर मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमूख उपस्थितीमध्ये करण्यात येणार आहे. या सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.