इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जालना : मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या विविध जागी होणाऱ्या सभा आणि त्यांना होणारी गर्दी चर्चेचा विषय ठरत आहेत. जरांगे पाटील यांना ऐकायला, मराठा आरक्षणाची भूमिका समजून घ्यायला मोठ्या संख्येने लोक येत असून या सभांचे भव्यदिव्य आयोजन अनेकांसाठी आश्चर्याचा भाग बनला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात होणारी ही सभा शनिवार १४ ऑक्टोंबर रोजी होणार आहे.
मराठा आरक्षणासाठी जालनातील अंतरवाली सराटी इथून राज्याच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी गावात जय्यत तयारी सुरू आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील यांनी उपोषण केले होते. जरांगे पाटलांच्या या उपोषणाला समाजाची मोठी साथ मिळाली. त्यातूनच पुन्हा एकदा मराठा आंदोलन राज्यभरात उभे राहिले. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे घेण्यासाठी सरकारच्या नाकीनऊ आले. सरकारने जीआर काढला, खुद्द मुख्यमंत्री शिंदे जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्यासाठी अंतरवाली सराटी गावात पोहचले होते. या उपोषणानंतर जरांगे पाटील राज्यभरात दौरा काढत आहेत. ठिकठिकाणी जरांग पाटील यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. आता १४ ऑक्टोबरला होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या सभेकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
१०० एकर जागा
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे १४ ऑक्टोबर रोजी सभा होणार आहे. या सभेची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. सभास्थळी १० फूट उंच स्टेज सभेसाठी उभारण्यात आला आहे. बीडमधून अंतरवाली सराटी येथे ५० जेसीबीने बरीच कामे सोपी केली. जरांगेच्या सभेसाठी जवळपास १०० एकर जागा निश्चित होती. परंतु एवढी जागा अपुरी पडेल या दृष्टिकोनातून परिसरातील आणखी जागा साफ करण्यात आली आहे. आता ही सभा १०० एकर ग्राऊंडवर घेण्यात येणार आहे. तर यासाठी ८० एकरवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आलीये. तर या सभेसाठी दहा हजार स्वयंसेवक हे उपस्थित राहणार आहेत. दहा अग्निशमन दलाच्या गाड्या सभेच्या स्थळी उपस्थित असतील. यामध्ये ११० रुग्णवाहिका, त्यात ३६ कार्डीयाक अम्ब्युलन्स असणार आहेत. तसेच ४० बेडस, ३०० डॉक्टर, ३०० नर्सिंग स्टाफ असेल. १२०००लिटरचे ५० पाणी टँकर या सभेच्या मैदानात असतील. ५ लाख पाणी बॉटल्स, १००० लाऊड स्पीकर, 20 LED स्क्रीनची तयारी या सभेसाठी करण्यात आली आहे.
मराठा समाज बांधव लोक वर्गणी आणि सहभाग घेत सभेसाठी आपले योगदान दिले आहे.