इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जालनाः मराठा समाजाला दिलेल्या दहा टक्के आरक्षणाला मान्य करण्याची तयारी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील दाखवली असली, तरी हे आरक्षण पन्नास टक्के मर्यादेच्या आत देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
ते म्हणाले, की मी शेतकऱ्याचा ग्रामीण भागातला मुलगा आहे. माझी भाषा तशीच आहे. मी कोणाला घाबरत नाही. तुरुंगात टाका नाही, तर कुठेही टाका; परंतु माघारी परत आल्यानंतर मी पुन्हा आरक्षणासाठी लढा उभारेल, असा इशारा त्यांनी दिला. सगसोयरेची अंमलबजावणी केली, तर मराठा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल.
जरांगे पाटील यांना अटक करण्याची मागणी होत आहे. त्याबाबत ते म्हणाले, की मला अटक करून जेलमध्ये टाका. त्यानंतर जे होईल त्याला मी जबाबदार नसेन. काहीही झाले तरी मी मागे हटणार नाही. मला तुरुंगात तर टाका, त्यानंतर लाट काय असते, हे तुम्हाला कळेल, असा इशाराही त्यांनी दिला. जरांगे पाटील यांनी राज्य सरकार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा इशारा दिला आहे.
फडणवीस हे माझे शत्रू नाहीत. ते या पदावर नसते, तर त्यांच्यावर टीका करायचे काहीच कारण नव्हते. असे जरांगे म्हणाले. फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर त्यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मी गद्दार नाही, मी पाठीत खंजीर खुपसत नाही, अशी टीका करताना आमची फसवणूक झाल्याचा आरोप त्यांनी केला.