नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शासकीय यंत्रणेकडून राबवण्यात आलेल्या उत्कृष्ठ उपक्रमांची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय स्तरावर नामांकन देत यामधून सर्वोत्कृष्ठ उपक्रमांना skoch या पुरस्काराने गौरविण्यात येते. सुप्रसिद्ध अशा राष्ट्रीय स्कॉच पुरस्काराचे ऑर्डर ऑफ मेरीट प्रमाणपत्र दुरदृश्यप्रणालीद्वारे स्कॉच ग्रुपचे रोहन कोचर यांच्या हस्ते जिल्हा परिषद नाशिकच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांना मिशन भगिरथ प्रयास या विशेष उपक्रमासाठी देण्यात आला. देशभरातून ३०० विविध प्रकल्पांनी या स्पर्धेत भाग घेतला होता ज्यामधील ७५ प्रकल्प ऑर्डर ऑफ मेरिट पुरस्कारासाठी पात्र झाले होते. विविध विषयातील तज्ञांनी दिलेले गुण तसेच नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने केलेले वोटिंग यातून या पुरस्कारासाठी प्रकल्पांची निवड होते.
मिशन भगीरथ प्रयास अंतर्गत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यात २०० पेक्षा अधिक साखळी बंधारे तयार करून जलसंधारणाचे काम झाले आहे. बॉटम अप अपरोचनुसार मागणीनुसार योजना करण्याची संधी असल्यामुळे जलसंधारणाच्या बाबतीत गावे स्वयंपूर्ण होण्यास मदत झाली आहे. पूर्णतः वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवत साखळी बंधा-यासोबतच वृक्षारोपण, जल पुनर्भरण, शोषखड्डे, सीसीटी इत्यादी विविध पूरक उपक्रम केल्यामुळे स्त्रोत बळकटीकरणास मदत झाली आहे. राष्ट्रीय स्कॉच पुरस्कारांची घोषणा ही लवकरच होणार असून नाशिक जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांसाठी राबवण्यात आलेल्या मिशन भागीरथ प्रयास उपक्रमाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आल्याने जिल्ह्याच्या दृष्टीने देखील ही अभिमानाची बाब आहे.