अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्य शासनाने प्रत्येक महसूल विभागात नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेतला असून नाशिक विभागाचा नमो महारोजगार मेळावा अहमदनगर येथे 28 व 29 फेब्रुवारी रोजी पार पडला. भिस्तबाग महल शेजारील मैदानात झालेल्या या नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिरात नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. 28 व 29 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या महारोजगार मेळाव्यात 300 पेक्षा अधिक कंपन्यांनी सहभाग नोंदवला. दि. 28 फेब्रुवारी रोजी 12 हजार विद्यार्थ्यांनी मुलाखतील दिल्या. 1 हजार 400 तरुणांना जागेवरच ऑफर लेटर देण्यात आले तर 4 हजार तरुणांची प्राथमिक स्तरावर निवड करण्यात आली. दि. 29 फेब्रुवारी रोजी 2 हजार 500 पेक्षा अधिक युवक-युवतींनी महामेळाव्यास भेट दिली असुन या दोन दिवसाच्या या मेळाव्यातुन 10 हजार तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे नियोजन आहे. यावेळी झालेल्या करिअर मार्गदर्शन शिबिरालाही युवा वर्गाचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. जागेवर निवड झालेल्या युवक-युवतींना मान्यवरांच्या हस्ते यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात निवडपत्राचे वितरण करण्यात आले. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातुन विविध बँकांमार्फत कर्ज उपलब्ध करुन देण्याबरोबरच विविध तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शनही यावेळी तरुण-तरुणींना करण्यात आले.
इयत्ता दहावी ते पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या युवक-युवतींना एकाच छताखाली रोजगाराच्या संधी आणि स्वयंरोजगाराबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विभागीय नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले. 28 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे या मेळाव्याचे उद्घाटन झाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संदेश दाखविण्यात आला, यावेळी राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनीही उपस्थित तरुण-तरुणींना मार्गदर्शन करत त्यांच्यात उत्साह वाढवला.
28 फेब्रुवारी रोजी सकाळपासुनच रोजगार इच्छुक उमेदवारांची नाव नोंदणी आणि प्रत्यक्ष मुलाखतींना सुरुवात झाली. सभामंडपात 10 दालनांमध्ये 30 टेबलवर नाव नोंदणीची व उमेदवारांनी भरलेले अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळपासूनच नाव नोंदणीसाठी युवक-युवतींची गर्दी पाहायला मिळाली. यावेळी राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाव नोंदणी कक्षांना भेटी देवून युवक-युवतींशी संवाद साधला.
नाव नोंदणी केलेल्या उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतानुसार उपलब्ध उद्योजक, आस्थापनेची आणि त्यामधील रिक्त पदांची माहिती देण्यासाठी मध्यवर्ती ठिकाणी मदत कक्ष तयार करण्यात आले होते. तसेच सर्व आस्थापनांची एकत्रित माहिती असलेला फलक दर्शनी भागात लावण्यात आला होता. विविध आस्थापना, उद्योजक यांच्या दालनांसाठी स्वतंत्र सभामंडप उभारण्यात आले होते.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातुन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे व जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या मार्गदर्शनखाली दोन दिवसीय नमो महारोजगार मेळाव्याचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले. या महारोजगार मेळाव्यास उपस्थित राहणाऱ्या तरुण-तरुणींच्या जेवण, नाश्ता याबरोबरच परजिल्ह्यातील तरुणांच्या राहण्याचीही व्यवस्था करण्यात आली होती. कौशल्य विकास विभाग व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी हा महामेळावा यशस्वी करण्यासाठी कठोर मेहनत घेतली.