मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकसभेची निवडणूक लवकरच जाहीर होईल. विविध पक्षाचे बरेच नेते रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसंबंधी आपला हक्क दाखवित आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची जागा ही भारतीय जनता पक्षाची असून भारतीय जनता पक्षच ही जागा लढवणार आहे असे ट्विट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केल्यामुळे शिंदे गटाचे टेन्शन वाढले आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवर शिवसेनेच्या शिंदे गटाने आग्रह धरला असून ज्या ठिकाणी शिवसेनेचे खासदार आहेत. तेथे शिवसेनाच निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले. पण, त्यानंतर हे ट्विट आले आहे. त्यामुळे भाजप ही जागा लढवणार असल्याचे जवळपास निश्चित असल्याचेही बोलले जात आहे.
या जागेवर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आहे. त्यामुळे शिंदे गटाने या ठिकाणी मागणी केली आहे. त्यात आता राणे यांनी दावा केल्यामुळे या ठिकाणी निलेश राणे हे उमेदवार असू शकतात. महायुतीत अनेक ठिकाणी जागा वाटपाबाबत तिढा आहे. त्यामुळे तो कसा सुटेल व त्यात कोणाचा पत्ता कट होतो हे महत्त्वाचे ठरणार आहे.