इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचाही समावेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे. क्रिकेटबरोबरच आणखी पाच खेळांना या स्पर्धेत भाग घेता येणार आहे. २०२८ साली साली अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे होणा-या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा थरार बघायला मिळणार आहे. मुंबईमध्ये सध्या सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
कार्यकारी समिती यावर शनिवारी होणाऱ्या बैठकीमध्ये यावर चर्चा करणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे स्पोर्ट्स डायरेक्टर असलेल्या किर्ती मॅककॉनेल यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली आहे.
मुंबईत येत्या १४ ऑक्टोबर २०२३ रोजी, जियो वर्ल्ड सेंटर येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या १४१ व्या सत्राचे आयोजन करण्यात आले असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या सत्राचे उद्घाटन करणार आहेत. हे सत्र, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्यांची एक महत्वाची बैठक मानली जाते. या सत्रात ऑलिम्पिक स्पर्धांच्या भविष्याशी संबंधित महत्वाचे निर्णय घेतले जातात. भारतात ही बैठक दुसऱ्यांदा होत आहे. याधीची बैठक सुमारे ४० वर्षांपूर्वी झाली होती. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे ८६ वे सत्र, नवी दिल्लीत १९८३ मध्ये झाले होते.
आता हे १४१ वे सत्र भारतात होत असून, हे सत्र, जागतिक सहकार्याला प्रोत्साहन देणारे, क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्तमाचा गौरव करणारे आणि मैत्री, परस्पर सन्मान, उत्कृष्टता अशा ऑलिम्पिक च्या आदर्श उद्दिष्टाना अधिक बळकट करणारे असेल. हे सत्र, क्रीडा क्षेत्राशी संबंधित विविध भागधारकांना परस्पर संवाद आणि ज्ञानाची देवाण-घेवाण करण्याची संधी उपलब्ध करून देणारे ठरेल.
या सत्राला, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाच आणि इतर सदस्य उपस्थित असतील. त्याशिवाय भारतातील क्रीडा क्षेत्रातील महत्वाच्या व्यक्ती आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेसह विविध क्रीडा महासंघाचे प्रतिनिधी उपस्थित असतील.