मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अल्पसंख्यांक समाजातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील युवक-युवती व इतर उमेदवारांकरिता विविध उपक्रम राबविण्यासाठी ‘बार्टी, महाज्योती, तार्ती, सारथी, अमृत’ या संस्थांच्या धर्तीवर संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था स्थापन करण्यात यावी. अशी मागणी राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
मंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘बार्टी, महाज्योती, तार्ती, सारथी, अमृत’ या संस्थांच्या धर्तीवर अल्पसंख्यांक समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील युवक-युवती व इतर उमेदवारांकरिता विविध उपक्रम, कार्यक्रम इ. राबविण्यात येऊन विद्यार्थी युवक-युवती इत्यादींचा शैक्षणिक, सामाजिक व सर्वांगिण विकास करण्यासाठी संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था स्थापन करण्याची आवश्यकता आहे.
तसेच राज्यातील सर्व घटकांतील नागरिकांच्या विकासाकरीता राज्य शासन प्रयत्नशील असल्याने अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांना रोजगार, स्वयंरोजगार उद्योग-उद्योजकता याकरीता कौशल्य विकास प्रशिक्षण व क्षमता निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी अल्पसंख्यांक समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील युवक-युवती व इतर उमेदवारांकरिता विविध उपक्रम राबविण्यासाठी ‘बार्टी, महाज्योती, तार्ती, सारथी, अमृत’ या संस्थांच्या धर्तीवर संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था स्थापन करणेबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.