नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पॅनासोनिक कंपनीच्या इलेक्ट्रीक वस्तूंची नकल करुन बनावटीकरण करून हुबेहुब इलेक्ट्रीक वस्तूची विक्री करणा-या विरुध्द अंबड पोलीस ठाण्यात सिडकोतील एकाविरोधात कॉपराईट कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीच्या वतीने टाकण्यात आलेल्या छाप्यात हा प्रकार पुढे आला आहे.
महेश अशोक आहिरे (रा.बंदावणेनगर,कामटवाडा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून तो बंदावणे नगर येथील मंगलमुर्ती इलेक्ट्रॉनिक्स दुकानाचा व्यवस्थापक आहे. याबाबत पॅनासोनिक लाईफ सोल्युशन इंडिया प्रा.लि. कंपनीचे इंबराज पांडीयन नाडर (रा.वाशी नवी मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. मंगलमुर्ती इलेक्ट्रॉनिक दुकानात पॅनासोनिक कंपनीच्या नावे बनावट वस्तू विक्री होत असल्याची माहिती कंपनीला मिळाली होती. त्यानुसार नाडर यांच्या पथकाने बुधवारी (दि.२८) छापा टाकला असता दुकानात तब्बल ३ लाख ७ हजार २६२ रूपये किमतीचा बनावट इलेक्ट्रीक व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा मुद्देमाल मिळून आला.
या ठिकाणी कंपनीचे बनावट अॅकर डीबी एमसीबी डिस्ट्रीब्युशन बोर्ड आणि अन्य सामान विक्री करीत साठा करून ठेवण्यात आले होते. सर्व साठा जप्त करीत पथकाने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक बिडकर करीत आहेत.