नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्याबरोबर डान्स प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याविरोधात बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधात्मक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस चौकशीतून सलीम कुत्ताबरोबर झालेली डान्स पार्टी आणि बडगुजर हजर असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी ही कारवाई केली.
नागपूर येथे गेल्या डिसेंबर महिन्यात झालेल्या हिवाळी अधिवेशनात या पार्टीचा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला. त्यानंतर बडगुजर यांच्याविरोधाक कारवाईची मागणी करण्यात आली होती. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या डिसेंबर महिन्यात बडगुजर यांची शहर गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली होती. सदरील चौकशीचा अहवाल आयुक्तांना प्राप्त झाला. या अहवालानंतर आडगाव पोलिस ठाण्यामध्ये बेकायदेशीर कृत्य केल्याचा ठपका ठेवत बडगुजर यांच्यासह सलीम कुत्ता उर्फ मोहमंद सलोम मौरा मोईद्दीन शेख याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बडगुजर यांची राज्य व केंद्र सरकारवर टीका
गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी पत्रकार परिषद घेत राज्य व केंद्र सरकारवर टीका केली. माझ्यावर दाखल झालेला गु्न्हा राजकीय दबावापोटी केला असल्याचा आऱोपही त्यांनी केला. पोलिसांनी चौकशी न करता गुन्हे दाखल केले. विरोधकांना दाबण्याचा हा प्रयत्न आहे. मी न्यायालयीन लढाई लढेन आणि जिंकेनही अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. माझ्या सोबत ज्यांनी नाव या प्रकरणात घेतली गेली. त्या सगळ्यांची चौकशीची मागणी त्यांनी केली. ८ वर्षानंतर हे प्रकरण बाहेर काढून त्यावर कारवाई केली जाणे हे निंदणीय असल्याचे त्यांनी सांगितले.