इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भोपाळः आज पहाटे तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान मध्य प्रदेशातील डिंडोरी येथील बडझर घाटात पिकअप गाडी उलटून १४ जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात वीस जण जखमी आहेत. जखमींना शाहपुरा येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. या गाडीत ४५ जण होते.
या अपघातात सहा पुरुष आणि आठ महिला ठार झाल्या. सर्वांचे वय १६ ते साठ दरम्यानचे आहे. पिकअप मालक अजमेर टेकम याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मंडला जिल्ह्यातील मसूर घुगरी गावाच्या चौकात कार्यक्रमासाठी आलेले गावकरी अमाही देवरीला परत होते. पिकअपवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती पलटी होऊन वीस फूट खाली कोसळली.
पिकअपचा विमा ऑगस्ट २०२१पर्यंत, तर सप्टेंबर २०२२ मध्ये फिटनेसची मुदत संपली होती, अशी माहिती मिळाली. जिल्हाधिकारी विकास मिश्रा आणि पोलिस अधीक्षक अखिल पटेल यांनी शाहपुरा रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.