इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पंढरपूर : परमेश्वराच्या चरणी लाखो-कोट्यवधी किमतीचे दागिने, रोख देणाऱ्यांची कमी नाही. देशभरात अनेक भाविक वेगवेगळ्या मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात दानकर्म करत असतात. अशाच एका भक्ताने पंढरपूरच्या विठ्ठलासाठी शेत विकून २५ तोळे सोन्याचा करदोडा अर्पण केला आहे. शेत विकून सोन्याचा दागिना अर्पण करणाऱ्या या भाविकाची चांगलीच चर्चा आहे.
समस्त महाराष्ट्राचे दैवत असलेला विठूरायाने सर्वांच्या हदयात अढळ स्थान मिळविले आहे. विठूरायाच्या दर्शनासाठी अबालवृद्ध जीवाचे रान करतातच पण त्याच्या कौतुकासाठी भाविक काहीही करायला तयार असतात. अशाच एका भक्ताने विठ्ठल भक्तीतून आपली सहा एकर शेती विकून विठुरायासह रुक्मिणी मातेला सोन्याची आभूषणे केली आहेत.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठुरायाच्या चरणी धाराशिव जिल्ह्यातील बाई लिंबा वाघे या विठ्ठल भक्ताने स्वत:ची सहा एकर शेती विकून लाडक्या विठुरायाला १८ लाख रुपयांचा २५ तोळ्याचा सोन्याचा करदोडा अर्पण केला आहे. बाई लिंबा वाघे यांची धाराशिव जिल्ह्यातील बेंबळी या गावात ११ एकर शेती आहे. त्यांना वारसदार नसल्याने त्यांनी ७८ लाखाला सहा एकर शेती नुकतीच विकली आहे. शेती विकून आलेल्या पैशातून आपल्या लाडक्या विठुरायाला १८ लाख रूपयांचे २५ तोळे वजनाचा सोन्याचा करदोडा तसेच रुक्मिणी मातेला दोन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण केले आहे.
सर्वत्र चर्चा
बाई लिंबा वाघे यांच्या विठ्ठल भक्तीची सर्वत्र चर्चा सुरू आहे. तसेच त्यांच्या या कार्याचे भाविकांकडून विठ्ठल रुक्मिणी मंदिरात देखील कौतुक केले जात आहे. वाघे यांच्या दानशूरवृत्तीमुळे आता पंढरपूर तसेच इतर प्रसिद्ध मंदिरांमध्ये दानदात्यांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.