नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कारागृहातून बाहेर पडताच इगतपुरी व घोटी भागात धुमाकूळ घालणा-या टोळीला ग्रामीण पोलिसांनी गजाआड केले आहे. महामार्गावरील हॉटेल्स आणि दारू दुकाने फोडणा-या या टोळीने दहा घरफोडी केली असून ते उघडकीस आले आहे. सराईत गुन्हेगारांची टोळीचा ग्रामिण पोलीस गेल्या काही दिवसांपासून शोध घेत होते. या टोळीच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेल्या दोन कार, दुचाकीसह चोरीचा मद्यसाठा असा सुमारे बारा लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार हसन हमजा कुट्टी (४५ मुळ रा.केरळ हल्ली शेवाळे चाळ,नवनाथनगर), दिलीप रूमालसिंग जाधव (२३),अनिल छत्तरसिंग डावर (२६ मुळ रा.दोघे सेंधवा मध्यप्रदेश हल्ली फुलेनगर),मुस्तफा अब्दूल अन्सारी (२५ मुळ रा.खेरटुंडा,झारखंड हल्ली चाळीसगाव फाटा मालेगाव),सय्यद इस्माईल सय्यद जहुर (४२ रा.अन्सारगंज गल्ली नं. २ मालेगाव),सईद शेख मजिद उर्फ सईद बुड्या (३४ रा.जमहुर नगर मालेगाव),मोहम्मद अस्लम अब्दूल सत्तार (३८ रा.अख्तराबाद मालेगाव),सय्यद निजाम सय्यद अन्वर (४० रा.आयशानगर,मालेगाव),हनिफ खान इकबाल खान (३२ रा.जमहुर कॉलनी,मालेगाव) व शेख तौफिक शेख सुलेमान उर्फ पापा फिटींग (२६ रा.नुमानीनगर मालेगाव) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
गेल्या शनिवारी (दि.२४) मध्यरात्री महामार्गावरील तळेगाव शिवारात असलेले साई प्लाझा हॉटेल चोरट्यांनी फोडले होते. किचनच्या खिडकीचे गज कापून हॉटेलमध्ये शिरलेल्या चोरट्यांनी गल्यातील रोकडसह महागडे मद्य असा सुमारे दोन लाख ४१ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस तपासात गेल्या दोन महिन्यात इगतपुरी आणि घोटी परिसरात हॉटेल्स आणि दारू दुकाने फोडल्याचे पुढे आल्याने स्थानिक गुन्हे शाखा कामाला लागली होती. निरीक्षक राजू सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने गुन्हा करण्याच्या पध्दतीचा आढावा घेत शोध घेतला असता नजीकच्या कालावधीत नाशिक शहर व मालेगावमध्ये घरफोडी करणारे सराईत नुकतेच कारागृहातून जामिनावर सुटल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने या टोळीचा म्होरक्या हसन कुट्टी याच्यावर पाळत ठेवून नाशिक शहरात त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलीस तपासात त्याने वरिल साथीदारांच्या मदतीने घरफोड्या केल्याची माहिती दिली. त्यामुळे त्याचे उर्वरीत साथीदार पोलीसांच्या हाती लागले.
मालेगाव व नाशिक शहरातील फुलेनगर भागातून त्यांना अटक करण्यात आली असून त्यांनी घोटी,इगतपुरीसह दिंडोरी तसेच चाळीसगाव शहर व अहमदनगर जिह्यातील राहूरी येथे घरफोड्या केल्याची कबुली दिली. संशयितांच्या अटकेने दहा गुह्यांचा उलगडा झाला असून अजून काही घरफोड्या उघडकीस येण्याची शक्यता पोलीस सुत्रांनी वर्तविली आहे. संशयितांच्या ताब्यातून चोरीचे विदेशी मद्य,गुह्यात वापरलेली इर्टिगा आणि इटियॉस कार व कुट्टी याने चोरीच्या पैश्यातून खरेदी केलेली मोपेड दुचाकी असा सुारे १२ लाख रूपये किमतीचा मुद्देमाल पोलीसांनी हस्तगत केला आहे. या टोळीचा हसन कुट्टी हा म्होरक्या असून त्याच्यावर घरफोडीचे तब्बल ३२ गुन्हे दाखल आहेत. त्यातील सात गुह्यात त्यास शिक्षा लागली आहे. तर संशयित शेख तौफिक उर्फ पापा फिटींग हा मालेगाव पोलीसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरोधात खून,दरोडा,जबरीचोरी यासारखे सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत.
अन्य संशयिता आंतरराज्यातील गुन्हेगार असून त्यांच्यावर दरोड्याची तयारी,घरफोडी,चोरी असे गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रेय कराळे, अधिक्षक विक्रम देशमाने,अप्पर अधिक्षक आदित्य मिरखेलकर व मालेगावचे अप्पर अधिक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजू सुर्वे,सहाय्यक निरीक्षक हेमंत पाटील,उपनिरीक्षक संदिप पाटील,नाना शिरोळे,जमादार शिवाजी ठोंबरे,हवालदार चेतन संवस्तरकर,प्रविन सानप,किशोर खराटे,हेमंत गरूड,सतिष जगताप,पोलीस नाईक विनोद टिळे,हेमंत गिलबिले,प्रदिप बहिरम, नरेंद्र कोळी सुभाष चोपडा,शरद मोगल,शिपाई योगेश कोळी,दत्ता माळी तसेच विशेष पथकाचे हवालदार संतोष हजारे,पोलीस नाईक विजय वाघ,सुनिल पाडवी,चंद्रकांत कदम,आदींच्या पथकाने केली.