इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्ली : वयाच्या ८९व्या वर्षी पत्नीपासून विभक्त होण्याची इच्छा व्यक्त करणारी याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. या प्रकरणातील पत्नीने वयाच्या ८२ व्या वर्षी घटस्फोटित म्हणून जगण्याची इच्छा नाही, अशी भावना व्यक्त केली. न्यायालयाने पत्नीचा भावनिक युक्तिवाद लक्षात घेत पतीची याचिका फेटाळून लावली.
घटस्फोटाची प्रकरणे वाढत असतानाही, भारतातील एक मोठी बाजू अजूनही लग्नसंस्थेला धार्मिक बंधनाप्रमाणे पाळते. आणि याच बाजूने निकाल देत सर्वोच्च न्यायालयाने एका ८२ वर्षीय महिलेला घटस्फोटाच्या खटल्यात सहानुभूतीपर निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयात एका ८९ वर्षीय पतीने आपल्या ८२ वर्षीय पत्नीपासून घटस्फोट हवा असल्याची याचिका दाखल केली होती. विवाह संबंध सुधारण्यापलीकडे गेल्याच्या कारणास्तव त्यांनी घटस्फोटाची मागणी केली होती.
मात्र महिलेने आपल्या घटस्फोटित म्हणून मरण यावे अशी इच्छा नाही असे म्हणत आपली बाजू मांडली त्यानंतर न्यायालयाने पतीची याचिका फेटाळून लावली. १९६३ मध्ये लग्न झालेल्या या जोडप्याला तीन मुलं आहेत. याचिकाकर्त्याच्या वकिलांच्या माहितीनुसार, भारतीय सैन्यात सेवेत असताना जानेवारी १९८४ मध्ये याचिकाकर्ता हा मद्रासमध्ये तैनात होता. त्यावेळेस पत्नीने त्याच्यासोबत न जाणे पसंत केले तेव्हा या जोडप्याचे नाते बिघडले होते. त्याऐवजी, तिने सुरुवातीला तिच्या पतीच्या पालकांसह आणि नंतर तिच्या मुलांसह राहण्याचा पर्याय निवडला होता. जिल्हा न्यायालयाने विवाह मोडण्याच्या पतीच्या याचिकेला परवानगी दिली होती. परंतु पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायाधीशांचा आदेश फेटाळून लावला होता. त्यानंतर त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली.