नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत करण्यात येत असून महाराष्ट्राचा इतिहास व संस्कृतीचा वारसा पुढे नेण्यास जिल्हा प्रशासन सदैव कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले.
सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई व नाशिक जिल्हा प्रशासनाच्या वतीने आजपासून सुरू झालेल्या पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे शानदार उदघाटन ढोल ताशा पथकाच्या गजरात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, विभागीय उपायुक्त रमेश काळे, उपायुक्त (करमणूक) राणी ताटे, तहसिलदार (सामान्य शाखा) मंजुषा घाटगे, तहसिलदार शोभा पुजारी, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अरूण कदम यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.
स्वागताध्यक्ष जिल्हाधिकारी जलज शर्मा म्हणाले की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून जिल्हास्तरीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या पाच दिवसात नृत्य, कला, मार्शल आर्ट, मैदानी खेळ, संगीत यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन सर्वांना घडणार आहे. या पाच दिवसीय महोत्सवास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मेजवानीचा आस्वाद घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला बागेश्री वाद्यवृंद कलाकारांनी ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज रचित नांदीचे सादरीकरण केले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वजन करण्यात आले. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी शिवकालीन शस्त्र प्रदर्शन दालन व शिवकालीन नाणी, गडकिल्ले चित्र प्रदर्शन दालनास भेट दिली.
सावित्रीच्या लेकी कार्यक्रमातून स्वरक्षणार्थ मार्शल आर्टसचे झाले सादरीकरण
यावेळी सावित्रीच्या लेकी या कार्यक्रमातून स्त्रियांनी स्वरक्षणार्थ करावयाच्या मार्शल आर्टची प्रात्यक्षिके विशाल दखणे यांनी सादर केली. या कार्यक्रमात महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अरूण कदम, आरती वाणी, कल्पेश कुलकर्णी व ऋतुजा घाटगे यांनी सहभाग नोंदविला.
शासनाच्या विविध विभागाचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. विशेष आकर्षण म्हणून बचतगटांचे प्रदर्शन व खाद्य संस्कृतीचेही आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवासाठी प्रवेश नि:शुल्क असून नागरिकांनी या सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
आज गुरूवार, 29 फेब्रुवारी, 2024 रोजी सायंकाळी ४ ते ५ यावेळेत श्यामची आई या नाटकाचे अ. भा. म नाट्य परिषद सादरीकरण करणार आहे. यानंतर ५ ते ६.३० या वेळेत सपान थिएटर्स नाशिक कलगीतुरा नाटकाचे सादरीकरण करतील आणि ६.३० ते १० या वेळात शुअर शॉट इव्हेंटस् तर्फे भूषण देसाई संकल्पित नवदुर्गा सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे.