नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्र व राज्य शासनाच्या वतीने शासकीय रुग्णालयांच्या आरोग्य सुविधांच्या दर्जा वाढावा व नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्या या हेतूने आरोग्य संस्थांना कायाकल्प पुरस्काराने गौरविण्यात येते. सन २०२२ -२३ या वर्षातील कायाकल्प पुरस्कारांची घोषणा आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आली असून नाशिक जिल्ह्यातील ३२ प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रास प्रथम क्रमांकाचा कायाकल्प पुरस्कार घोषित झाला आहे. याचसोबत नाशिक जिल्ह्यातील ३१ प्राथमिक आरोग्य केंद्रांना उत्तेजनार्थ पुरस्कार घोषित झाले आहेत.
नागरिकांना सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छ व आरोग्यदायी वातावरणामध्ये आरोग्य सुविधा मिळाव्यात व आरोग्य संस्थांच्या अधिकारी व कर्मचारी यांनी या आरोग्य सुविधांमध्ये सातत्य ठेवावे, यासाठी कायाकल्प पुरस्कार योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत आरोग्य संस्थांना त्यांनी केलेल्या उत्कृष्ट उपाययोजना आधारावर पुरस्कृत करण्यात येते. यामध्ये गुणांकन करण्यात येऊन निर्धारित मानक पूर्ण करणाऱ्या आरोग्य संस्थांना रोख रकमेचे पुरस्कार देण्यात येतात. नाशिक तालुक्यातील जातेगाव या प्राथमिक आरोग्य केंद्रास कायाकल्प पुरस्कार घोषित आला असून या पुरस्काराची रक्कम २ लक्ष रुपये आहे. इतर ३१ प्राथमिक आरोग्य केंद्रांना उत्तेजनार्थ पुरस्कार घोषित झाला असून या प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी ५० हजार रुपये रकमेचा पुरस्कार देण्यात येणार आहे.
स्मार्ट PHC उपक्रमाचे यश –
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी स्मार्ट PHC नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत असून या उपक्रमांतर्गत निवड केलेल्या ४० प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये भौतिक सुविधांसह आरोग्य सुविधांचा दर्जा वाढवण्यात येत आहे. कायाकल्प उपक्रमांतर्गत निवड झालेल्या ३२ प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी १८ प्राथमिक आरोग्य केंद्रांची निवड झाली आहे. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्मार्ट PHC उपक्रमाचे देखील हे यश आहे असे प्रतिपादन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी केले.
या आरोग्य केंद्रांचा झाला ‘कायाकल्प’ –
जातेगाव, तळेगाव, मोहाडी, ओझर, अंबोली, देवगाव, खामखेड, पिंपळगाव बसवंत, वडनेर खाकुर्डी, करंजळी, निमगाव, नैताळे, लोहनेर, पांढुर्ली, सोनज, सय्यद पिंप्री, पालखेड, कनाशी, सौंदाणे, उसवड, मुखेड, दहीवड, काझीसांगवी, चिंचोली, पांडाणे, साल्हेर, तळेगाव रोही, ओतूर, वडनेर भैरव, सावरगाव, मुल्हेर, मुळवड.