नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्वेच्छा रक्तदान हेच सर्वोत्तम दान असून प्रत्येक पात्र रक्तदात्याने वर्षातून किमान एकदा तरी रक्तदान करावे. यासाठी स्वतःचा वाढदिवस रक्तदान करुन साजरा करावा, असे आवाहन नाशिक मंडळाचे विभागीय रक्त संक्रमण अधिकारी ह.भ.प. डॉ. पुरुषोत्तम पुरी यांनी केले.
ऐच्छिक रक्तदान मास ऑक्टोबर २०२३ निमित्त आयोजित विविध जनजागृती उपक्रमांतंर्गत सिडको येथे आयोजित किर्तनात ते बोलत होते. “हेची दान दे गा देवा” या संत तुकोबांच्या अभंगावर विवेचन करतांना भगवद्गीतेतील सात्विक, राजस व तामस दान आणि ऐच्छीक, बदली व व्यावसायीक रक्तदान अशी वैचारिक मांडणी डॉ. पुरी यांनी केली. लावणी, पोवाडे, अभंग, भारुड आदींच्या माध्यमातून रक्तदानाचा प्रचार व प्रसार करतानाच किर्तनाच्या माध्यमातून जनसामान्यांचे रक्तदान विषयक लोकशिक्षण केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
मेट्रो रक्तपेढी, शासकीय जिल्हा रुग्णालय, शासकीय रक्तपेढी, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय व स्वानंद अध्यात्म ज्ञानपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने त्रिमूर्ती चौकातील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर सभागृहात किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी नाशिक विभागाचे माहिती उपसंचालक ज्ञानेश्वर इगवे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. राजेंद्र सावंत, नवजीवन रक्तपेढीचे वैद्यकीय संचालक डॉ. राजेश कुचेरीया, कर्करोग विशेषज्ञ डॉ. शंतनु पवार आदि मान्यवर तसेच वारकरी बंधु भगिनी, रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वानंद अध्यात्म ज्ञानपीठाचे श्री प्रल्हाद गुंजाळ, जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी रक्तपेढीचे डॉ.राजेंद्र दुसाने, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ. दिपक पाटील, मनोज बिरकुरे, अभिजित कापसे, मेट्रो रक्तपेढी व संदर्भ रुग्णालयाच्या रक्तपेढीचे सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. असेही डॉ. पुरी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.