नाशिक (इंडिया दर्पण वृत्तेसवा) – प्रधानमंत्री सूर्य घर योजनेसाठी २७ फेब्रुवारी पासून सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. सदर सर्वेक्षणाचे काम भारतीय डाक विभागातील पोस्टमन घरोघरी येवून करणार आहेत. यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नाशिक विभागाचे प्रवर अधीक्षक डाकघर प्रफुल्ल वाणी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
प्रधानमंत्री सूर्य घर योजनेचा लाभा १ कोटी घरांना मोफत मिळणार आहे. या योजनेंतर्गत ३०० युनिटपर्यंत मोफत वीज देवून १ कोटी घरांना प्रकाश देण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे. सौर पॅनेलसाठी नागरिकांना जास्तीत जास्त अनुदान देण्यात येणार असून सौर पॅनेलच्या किंमतीसाठी जनतेवर कोणताही बोजा पडणार नाही यासाठी शासन प्रयत्नशील आहे. सदर योजना तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचविण्याठी शहरी स्थानिक संस्था आणि पंचायतींना त्यांच्या अधिकार क्षेत्रातील छतावरील सौर पॅनेलला प्रोत्साहन दिले जाणार आहे.
या योजनेमुळे लोकांना अधिक उत्पन्न मिळेल, वीज बिल कमी होवून रोजगार निर्मिती होणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.