नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– भारत निवडणूक आयोगाकडून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी पूर्वतयारी सुरू आहे. मतदान केंद्रावर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी त्याचप्रमाणे अपवादात्मक परिस्थितीत गैरप्रकार आढळून आल्यास त्यावर कठोर कारवाई करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून संवेदनशील तसेच जास्त गर्दी होणाऱ्या मतदान केंद्रांच्या ठिकाणी वेबकास्टींग, व्हिडीओग्राफी तसेच सूक्ष्म निरीक्षक यांची व्यवस्था केली जाणार आहे. ही माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी दिली आहे.
नाशिक जिल्ह्यात एकूण 4739 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून संवेदनशील व गर्दी होणाऱ्या केंद्रांच्या ठिकाणी व किमान 50 टक्के मतदान केंद्रावर वेबकास्टींगची व्यवस्था केली जाणार आहे. सदर वेबकास्टींगच्या माध्यमातून मतदान केंद्रावरील सर्व कामकाज भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई तसेच निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक, दिंडोरी, धुळे लोकसभा मतदार संघ हे पाहू शकणार असल्याने केंद्रावर गैरप्रकार करणाऱ्यांना पूर्ण आळा बसणार आहे.
याचप्रमाणे मतदान केंद्रांच्या परिसरात अनावश्यक गर्दी करुन कायदा व सुव्यवस्था बिघडवून मतदान प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्यांवर व्हिडीओ कॅमेऱ्याची नजर असणार आहे. त्यामुळे पोलीस विभागास संबंधितांवर कारवाई करणे सुलभ होणार आहे. प्रत्यक्ष मतदान केंद्रामध्ये भारत निवडणूक आयोगाने विहित केलेल्या कार्यपध्दतीनुसार सर्व संबंधित नेमणूक केलेले अधिकारी व कर्मचारी कामकाज करतात किंवा कसे? यावरही सूक्ष्म निरीक्षक यांची
नजर राहणार आहे. सदर सूक्ष्म निरीक्षक त्यांचा अहवाल थेट मा. निवडणूक निरीक्षकांना सादर करणार असल्याने संवेदनशील तसेच गर्दीच्या मतदान केंद्राच्या ठिकाणी होणारे गैरप्रकार रोखण्यास आणखी मदत होणार आहे.एकूणच प्रत्यक्ष मतदान केंद्रावर मतदारांना मुक्त, निर्भयपणे, पारदर्शक पध्दतीने मतदानाचा अधिकार बजावता यावा याकरिता निवडणूक आयोग कटिबध्द असल्याची माहिती श्री. जलज शर्मा यांनी दिली आहे.