नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महात्मानगर भागात सेट्रींगचे काम करीत असतांना सातव्या मजल्यावरून पडल्याने ३२ वर्षीय मजूराचा मृत्यू झाला. यशवंत किसन खाडम (३२ रा.मोरवाडा ता.मोखाडा जि.पालघर) असे मृत कामगाराचे नाव आहे. या घटनेने बांधकाम साईटवरील कामगारांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
खाडम मंगळवारी (दि.२७) सायंकाळच्या सुमारास महात्मानगर येथील समृध्दी हरिपाठ इमारतीवर सेट्रींगचे काम करीत असतांना ही घटना घडली. सातव्या मजल्यावर सीडीवर उभा राहून काम करीत असतांना अचानक तोल गेल्याने तो जमिनीवर कोसळला होता.
या घटनेत गंभीर दुखापत झाल्याने ठेकेदार अनिल बालजीभाई भगत याने त्यास जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास उपनिरीक्षक मुंढे करीत आहेत.