इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्ह्यातील तसेच तीन वर्षांहून अधिक काळ पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. या आदेशात मुंबई महापालिकेच्या आयुक्तांचा अपवाद करण्याची राज्य सरकारची विनंती निवडणूक आयोगाने फेटाळली असल्याने मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांची बदली अटळ आहे.
चहल यांची बदली रोखण्यासाठी राज्य सरकारने केलेले प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. चहल यांची बदली रोखण्यासाठी महापालिका आयुक्तांना तीन वर्षांचा निकष लागू करू नये, अशी विनंती राज्य सरकारने केली होती; परंतु ही मागणी निवडणूक आयोगाने अमान्य केली आहे. त्यामुळे चहल यांच्यासह अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे आणि अन्य काही अधिकाऱ्यांच्या आता बदल्या होणार आहेत.
निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात तीन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ पदावर असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा आदेश दिला होता. महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांचा थेट निवडणूक प्रक्रियेत सहभाग नसतो. त्यामुळे त्यांना बदली आदेशातून वगळावे, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली होती. राज्य सरकारने निवडणूक आयोगाला पक्षही दिले होते; परंतु आयोगाने सरकारची ही विनंती नाकारली आहे.