मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये ४ टक्के वाढ होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंजुरीनंतर हा भत्ता लागू होणार आहे. कामगार करारातील थकबाकीच्या मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एसटी कामगार संघटनांना दिले आहे. यामुळे गेल्या पंधरवड्यापासून सुरू असलेले एसटी कामगार संघटनांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात एसटी कामगार संघटनांचे शिष्टमंडळ यांच्यात मंगळवारी बैठक पार पडली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता करण्याची मागणी बैठकीत पूर्ण करण्यात आली. तसेच, कामगार करारातील मूळ वेतनातील विसंगती दूर करून सरसकट पाच हजार रुपये देण्याचे मंत्र्यांनी तत्वत: मान्य केले आहे. या निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी याच आठवड्यात करून फरकाची रक्कम देण्यासाठी वित्त विभागाकडे बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे, असे आश्वासन मंत्री सामंत यांनी दिले आहे. यामुळे आझाद मैदानासह राज्यातील चार विभागीय कार्यालयात सुरू असलेले एसटी कामगारांचे उपोषण स्थगित घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे एसटी कामगार संघटनांचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितले.
महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढ आणि त्यांची थकबाकीसह २०१६-२०२० च्या कामगार करारातील थकीत रक्कमेचे समान वाटप करणे या आणि अन्य मागण्यांसाठी एसटी कामगार संघटनेने ११ फेब्रुवारीपासून आझाद मैदानात उपोषण सुरू केले होते.