नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्वयंपाक करीत असतांना साडीने पेट घेतल्याने भाजलेल्या ७६ वर्षीय वृध्देचा मृत्यू झाला. गेली दोन दिवस महिला मृत्यूशी झुंज देत होती. याबाबत नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुषमा सुधाकर माईनकर (रा.श्री सिध्दीविनायक अपा.काळेनगर जेलरोड) असे मृत वृध्देचे नाव आहे.
माईनकर या गेल्या रविवारी (दि.८) आपल्या राहत्या घरात स्वयंपाक करीत असतांना ही घटना घडली होती. अचानक गॅसवर साडीचा पदर पडल्याने त्या गंभीर भाजल्या होत्या. जावई मकरंद लोकरे यांनी त्यांना तातडीने नजीकच्या रेडीयन्ट हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.
उपचार सुरू असतांना गुरूवारी वैद्यकीय सुत्रांनी त्यांना मृत घोषीत केले. याबाबत डॉ. श्वेता ठाकरे यांनी खबर दिल्याने पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार भोळे करीत आहेत.