मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जळगाव जिल्ह्यातील ७ तालुक्यात जून, २०१९ मध्ये वादळ व गारपीटीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानासाठी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी ३ कोटी २५ लाख ४२ हजार इतका निधी वितरीत करण्यास राज्य शासनाने मंजूरी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय २६ फेब्रुवारी २०२४ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना मदत व दिलासा मिळेल, असे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले.
जळगाव जिल्ह्यात जून, २०१९ मध्ये वादळी वारा व गारपीटीमुळे ३ हजार ८५६ बाधित शेतकऱ्यांच्या २ हजार ३९०.०८ हेक्टरवरील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडून प्रस्ताव प्राप्त झाला होता. या प्रस्तावास मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानुसार बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी हा शासन निर्णय निर्गमित केल्याचे मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले