इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना चांगलेच फटकारले. मंगळवार पर्यंत नवे वेळापत्रक देण्याचे आदेशही त्यांनी आज दिले. ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या याचिकेवरील एकत्रित सुनावणीसर न्यायाधीश धनंजय चंद्रचूड याच्या नेतृत्वाखालील तीन न्यायामूर्तींच्या खंडपीठा समोर आज झाली. यावेळी सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षां बरोबरच महाधिवक्ता तुषार मेहता यांचेही कान टोचले. विधानसभा अध्यक्षांनी अगोदर दिलेले वेळापत्रक अमान्य करुन सुधारीत वेळापत्रक देण्याचे सांगितले.
यावेळी न्यायालयाने सांगितले की, १४ जुलैमध्ये आम्ही नोटीस काढली. सप्टेंबरमध्ये आदेश काढला. पण विधानसभा अध्यक्षांनी काहीच केलं नाही. विधानसभा अध्यक्षांनी जूनपासून काहीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे आता त्यांनी पुढील निवडणुकीच्या आधी निर्णय घ्यावा. नाही तर आम्हाला एक आदेश काढावा लागेल. निवडणुकीच्या आधी निर्णय झाला नाही तर विधानसभा अध्यक्षांपुढील कार्यवाही निरर्थक ठरेल, असेही कोर्टाने सांगितले.
यावेळी सर्वोच्च न्यायलयाने सांगितले की, विधानसभा अध्यक्षपद घटनात्मकपद असले तरी आम्ही आदेश देऊ शकतो. आता आमदार अपात्रतेची सुनावणी मंगळवारी ठेवली आहे. यावेळी त्यांनी मंगळवारपर्यंत वेळापत्रक द्या. विधानसभा अध्यक्ष आणि महाधिवक्त्यांनी या संदर्भातील वेळापत्रक तयार करून कोर्टाला द्यावे. मंगळवारपर्यंत वेळापत्रक न दिल्यास आम्ही आदेश देऊ, असेही कोर्टाने बजावले आहे.