नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मराठी भाषा अधिक समृद्ध व प्रगत व्हावी यासाठी प्रत्येकाने आपल्या दिनचर्येत मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त करून मराठी भाषेची व्याप्ती वाढवावी, असे आवाहन नाशिक विभागाचे उपायुक्त (सामान्य प्रशासन) रमेश काळे यांनी आज येथे केले.
मु. शं औरंगाबादकर सभागृह, सार्वजनिक वाचनालय येथे उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई, विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, माध्यमिक शिक्षण विभाग, जि.प., जिल्हा ग्रंथालय संघ व सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नाशिक ग्रंथोत्सव २०२३ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
श्री. काळे व सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपसंचालक (माहिती) ज्ञानोबा इगवे, सार्वजनिक वाचनालयाचे प्रमुख सचिव देवदत्त जोशी, कार्याध्यक्ष ॲड. अभिजीत बगदे, सहसचिव जयेश बर्वे, ग्रंथ सचिव जयप्रकाश जातेगावकर, जिल्हा ग्रंथालय संघ अध्यक्ष अजय शहा, ग्रंथ विक्रेता प्रतिनिधी वसंत खैरनार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी, शासकीय विभागीय ग्रंथालय अविनाश येवले, जिल्हा ग्रंथालय अधिकारी तथा सहाय्यक ग्रंथालय संचालक सचिन जोपुळे यांच्यासह जिल्हा ग्रंथालय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच सारडा कन्या विद्यालयातील विद्यार्थी व साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपायुक्त रमेश काळे म्हणाले, मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने ग्रंथोत्सव, ग्रंथदिंडी, ग्रंथ प्रदर्शन यासारखे कार्यक्रम शासनस्तरावर जिल्हा व तालुकास्तरावर राबविण्यात येत असून यासाठी शासनाने निधीही उपलब्ध करून दिला आहे. मराठी भाषेचा वापर दैनंदिन कामकाजात व्हावा व मराठी भाषा संवर्धनासाठी यासाठी शासन प्रयत्नशील आहे. राज्य शासनाने याबाबत काही निर्णय सुद्धा घेतलेले आहेत. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने वाचन संस्कृती वृद्धींगत होण्याच्या दृष्टीने तालुका स्तरावरील शाळांमधून असे कार्यक्रम आयोजित केल्यास विद्यार्थ्यांमध्येही वाचनाची आवड शालेय जीवनापासून निर्माण होईल असे सांगत श्री. काळे यांनी जिल्ह्यातील ग्रंथालयांच्या कार्याचे कौतुक करीत उपस्थितांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके म्हणाले, मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषेचा गौरव हा तिच्या घरात झाला पाहिजे. यासाठी प्रत्येकाने स्थानिक पातळीवर संभाषण करतांना मराठीतच व्यक्त व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. सर्व जिल्ह्यातील वाचनालये एकत्र येवून ग्रंथ, ग्रंथालय व वाचन संस्कृती समृद्ध होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. येणाऱ्या काळात ग्रंथोत्सव व मराठी भाषा गौरव दिन यासारखे कार्यक्रम केवळ दोन दिवसीय न राबविता याचा कालावधी जास्त दिवसांचा केल्यास याचा सकारात्मक परिणाम निश्चित दिसेल असा विश्वास प्रा. फडके यांनी यावेळी व्यक्त केला.
जिल्हा ग्रंथालय संघ अध्यक्ष अजय शहा, ग्रंथ सचिव जयप्रकाश जातेगावकर यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन जोपुळे यांनी तर आभार अविनाश येवले यांनी मानले.प्रारंभी ग्रंथोत्सव २०२३ चे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. त्यानंतर ग्रंथोत्सवातील 12 स्टॉल्सला मान्यवरांनी भेट दिली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सारडा कन्या विद्यालयाच्या मुलींनी मराठी भाषा गौरव दिन गीताचे सादरीकरण केले.
कार्यक्रमात सार्वजनिक वाचनालय टिळकपथ नाशिक, साधना वाचनालय, ग्रामपंचायत घोटी, ता. इगतपुरी, लोकमान्य स्मारक मोफत वाचनालय, त्र्यंबकेश्वर, न्यायमूर्ती रानडे मोफत वाचनालय, रविवार पेठ, लोकमान्य वाचनालय, नांदगाव, मनमाड सार्वजनिक वाचनालय, ता. नांदगाव, मनमाड, श्री. माणकेश्वर वाचनालय, निफाड, प. बा. काकणी नगर वाचनालय रामसेतू, मालेगाव, उर्दू लायब्ररी, मालेगाव, सार्वजनिक वाचनालय, येवला व खुटाडे मोफत वाचनालय, नामपूर (ता. सटाणा) या ग्रंथालयांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
ग्रंथदिंडीने वाढविली शोभा
दरम्यान ग्रंथोत्सवानिमित्त सकाळी आयोजित ग्रंथदिंडीचे कार्यक्रमाची शोभा वाढवली. जिल्हाधिकारी जलज शर्मा, उपायुक्त सामान्य प्रशासन नाशिक विभाग रमेश काळे यांनी प्रथम ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस अभिवादन केले व ग्रंथदिंडीचे उद्घाटन ग्रंथ पालखीला खांदा देवून केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, तहसिलदार (समान्य शाखा) मुंजुषा घाटगे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन जोपुळे, अविनाश येवले कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विश्वस्थ हेमंत टकले, सोमनाथ मुठाळ, संजय करंजकर, देवदत्त जोशी, धर्माजी बोडके अॅड.निकम, अविनाश येवले यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
ग्रंथदिंडीत सारडा कन्या विद्यामंदिर, रचना विद्यालय, वाघ गुरूजी प्राथमिक विद्यामंदिर, पेठे विद्यालय, रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालय, मराठा हायस्कूल नाशिक, रूंगठा विद्यालय, पुष्पावती रूंगठा विद्यालय, वाय डी बिटको हायस्कूल, डी. डी. बिटको हायस्कूलचे विद्यार्थी वेगवेगळ्या वेशभूषेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांच्यासोबतच शिक्षक व मान्यवर ग्रंथदिंडीत सहभागी झाले होते.