मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र शासनातील वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री माननीय सुधीर मुनगंटीवार यांनी १ ते ३ मार्च दरम्यान जगातील वाघांची राजधानी म्हटल्या जाणाऱ्या चंद्रपूर येथे ‘ताडोबा फेस्टिव्हल’चे आयोजन करीत असल्याची घोषणा केली. यावेळी आयोजित कार्यक्रमात ७१ व्या मिस वर्ल्डच्या टीमने राज्य सरकारच्या ‘सेव्ह द टायगर’ मोहिमेला आपले समर्थन जाहीर केले. दरम्यान श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी येत्या आठवड्यात ताडोबा फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी आणि त्यावेळेस ताडोबा सफारीचा आनंद घेण्यासाठी मिस वर्ल्ड टीमला आणि त्यातील स्पर्धकांना आमंत्रण दिले आहे. ७१ व्या मिस वर्ल्डचा ग्रँड फिनाले ९ मार्च २०२४ रोजी जिओ कन्व्हेन्शन सेंटर, मुंबई येथे होईल आणि याचे थेट प्रक्षेपण सोनीलिव्ह ॲपवर केले जाईल.
माननीय श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “वाघांची संख्या २०१६ मध्ये ३८९० होती, जी २०२३ मध्ये ५५७५ वर पोहोचली आहे. त्यातही भारत आणि नेपाळ दुप्पट आकड्यांसह आघाडीवर आहेत. या सुंदर बिग कॅट्सचे संरक्षण करण्याच्या आमच्या एकत्रित प्रयासांची यातून साक्ष मिळते. मिस वर्ल्ड टीमचा जागतिक प्रभाव लक्षात घेता त्यांचे आदरातिथ्य करणे वाघांच्या संरक्षणाचे निरंतर यश जागतिक स्तरावर घेऊन जाण्यासाठी महत्त्वाचे वाटते, जेणे करून आगामी अनेक पिढ्यांपर्यंत वाघ जंगलात राहू शकतील.”
मिस वर्ल्ड संस्थेच्या प्रमुख आणि सीईओ श्रीमती जूलिया मॉरली म्हणाल्या, “आम्ही स्वतः सकारात्मक बदलाच्या अम्बॅसडर असल्यामुळे अशा विशिष्ट संदेशाचा प्रचार करणाऱ्या समारंभात आम्हाला आमंत्रित करण्यात आले, याचा आम्हाला अभिमान वाटतो. वाघ म्हणजे केवळ सौंदर्य आणि ताकदीचे प्रतीक नाही, तर आपल्या पृथ्वीतलावर पर्यावरणीय संतुलन साधण्यासाठी त्यांचे विशेष महत्त्व आहे. या सुंदर प्राण्यांना स्थिर भविष्य देणीसाठी करण्यात येणारे प्रयत्न पाहून आम्हाला आनंद झाला आहे.”
या अभियानाचा उद्देश त्यांच्यापासून त्यांचे निवासस्थान हिरावून घेणे, त्यांची अवैध शिकार करणे आणि मनुष्य आणि वन्य जीवनातील संघर्ष यामुळे वाघांना सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या धोक्यांवर प्रकाश टाकण्याचा आहे. वाघांच्या संख्येत यशस्वीरित्या झालेली वाढ हा आसपास राहणाऱ्या समुदायांत आणि वन्यजीवांमध्ये सहजीवनास प्रोत्साहन देण्याबाबत सरकारच्या रणनीतींचा परिणाम आहे. हे यश साजरे करण्यासाठी ‘ताडोबा फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात येणार आहे.