नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काठेगल्लीतील अमृतरत्ननगर भागात पॉलिश करण्याच्या बहाण्याने भामट्याने महिलेच्या हातातील सुमारे सव्वा लाख रूपये किमतीच्या दोन सोन्याच्या बांगड्या हातोहात लंपास केल्या. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनिता बाळासाहेब फटांगरे (रा.नयनतारा अपा.शेजारी काठेगल्ली) यांनी तक्रार दाखल केली आहे. फटांगरे या सोमवारी (दि.२६) दुपारच्या सुमारास घरात एकट्या असतांना ही घटना घडली. घरात एकट्या असतांना दोघा भामट्यांनी त्यांना गाठले. भांडे आणि सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देतो अशी बतावणी करीत भामट्यांनी महिलेचा विश्वास संपादन केला. यावेळी महिलेने घरातील एक भांडे त्यांना पॉलिशसाठी आणून दिले असता संशयितांनी अॅसिडचा एक थेंब हातातील बांगडयांवर टाकून दाखविला. बांगड्यावर थेंब टाकलेला भाग चमकू लागल्याने महिला आकर्षित झाली. त्यांनी दोन्ही बांगड्या पॉलिशसाठी दिल्या.
दरम्यान त्यातील एक संशयित घराबाहेर निघून गेला. काही वेळानंतर दुसरा संशयितही त्याला बोलून आणण्याच्या बहाण्याने बांगड्या हातात ठेवत बाहेर गेला. बराच वेळ होऊनही तो परतला नाही. यामुळे बांगडया लंपास झाल्याची खात्री झाल्याने फटांगरे यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक तोंडे करीत आहेत.