नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्हा व सत्र न्यायालयाने भाजीपाला खरेदी करून घराकडे परतणा-या वृध्देच्या गळयातील सोनसाखळी खेचणा-या तरूणास पाच वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. दंगल उर्फ उमेश अशोक पाटील (२८ रा.रत्नदिप रो हाऊस,कदम मळा जयभवानीरोड) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना हिरावाडीतील क्षिरसागर कॉलनीत घडली होती. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शारदा वसंतलाल चुडासन (५५ रा.क्षिरसागर कॉलनी,हिरावाडी) यांनी फिर्याद दिली होती. शारदा चुडासन या २१ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळच्या सुमारास परिसरातून भाजीपाला खरेदी करून आपल्या घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली होती. समृध्दी सोसायटी जवळून त्या रस्त्याने पायी जात असतांना दुचाकीस्वाराने त्यांच्या गळयातील सुमारे २० हजार रूपये किमतीची सोनसाखळी ओरबाडून नेली होती. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर गंगापूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन उपनिरीक्षक एस.एस.भिसे यांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या असता या जबरीचोरीचा उलगडा झाला होता.
पंचवटीचे तत्कालीन सहाय्यक निरीक्षक सत्यवान पवार यांनी या गुह्याचा तपास करून पुराव्यानिशी दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. हा खटला अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्ट क्र.७ चे न्या.प्रतिभा पाटील यांच्यासमोर चालला. सरकारतर्फे अॅड.एस.एस.चितळकर यांनी काम पाहिले. न्यायालयाने फिर्यादी साक्षीदार व पंच यांनी दिलेली साक्ष आणि सरकारपक्षाच्या वतीने सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य पुराव्यास आधारे आरोपी दंगल पाटील यास पाच वर्ष सश्रम कारावास व दहा हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.