नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सातपूर पोलीसांनी औद्योगीक वसाहतीतील अशोकनगर येथील निलकंठेश्वर महादेव मंदिरात चोरी केल्याप्रकरणी तिघांना बेड्या ठोकल्या. सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे पथकाने त्र्यंबकेश्वर तालूक्यातील पिंप्री गावात ही कारवाई केली असून संशयितांच्या ताब्यातून सुमारे दोन लाख रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रोशन भगवान भाडमुखे (२१) प्रताप दत्तू वाघ (२४ रा. दोघे पिंप्री ता.त्र्यंबकेश्वर) व सुनिल जयराम महाले (२० रा.हिरडी ता.त्र्यंबकेश्वर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. अशोकनगर येथील विश्वास नगर भागात असलेल्या निलकंठेश्वर महादेव मंदिरात चोरी झाली होती. गेल्या बुधवारी (दि.२१) सकाळच्या सुमारास ही बाब निदर्शनास येताच याबाबत डायल ११२ वर तक्रार करण्यात आली होती. या घटनेची गंभीर दखल घेण्यात आल्याने वरिष्ठांसह सातपूर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. चोरट्यांनी मंदिरातील महादेवाच्या पिडीवरील पंचधातूचा मुकूट, पिडींच्या खाली लावलेली पंचधातूचे कवच, पिंडीचे वरती लावलेली पंचधातूचा तांब्या तसेच देवीचा मुखवटा, दानपेटीतील रोकड व मंदिरातील पुजेचे साहित्य असा ऐवज पळविल्याने सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आयुक्त संदिप कर्णीक,उपायुक्त मोनिका राऊत व सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख व वरिष्ठ निरीक्षक सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली यंत्रणा कामाला लागली होती. पथकांनी सीसीटिव्हीच्या माध्यमातून त्र्यंबकेश्वर तालूक्यातील बेझे,पिंप्री,हिरडी व रोहिले या गावांमध्ये तळ ठोकत दुचाकीस्वार चोरट्यांचा माग काढला असता संशयित पोलीसांच्या हाती लागले. पोलीस चौकशीत त्यांनी गुह्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून दुचाकीसह चोरीचा मुद्देमाल असा सुमारे दोन लाखाचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई उपनिरीक्षक प्रकाश कातकाडे,हवालदार खरपडे अंमलदार सागर गुंजाळ,शेजवळ,गायकवाड हवालदार आहेर,गायकवाड,अंमलदार कनोजे,जाधव,महाले,पाटील शिंदे व भोये आदींच्या पथकाने केली.