नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सातपूर औद्योगीक वसाहतीतील ट्रान्सपोर्ट कंपनीच्या गोडावून मधून कॉपर धातूचे ब्लॉक व कॉपर ट्यूब चोरी करणा-या चार जणांच्या टोळीस पोलीसांनी गाआड केले आहे. या टोळीकडून पोलिसांनी सुमारे सात लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई सातपूर पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाने केली.
मनिष मदन सिंग (१९ रा.इंगोले संकुल,दत्तनगर),आदित्य उर्फ दिपक गजानन लोट (२० रा.माऊली चौक,दत्तनगर),महिंद्र देवसिंग बागुल (२३ रा.हरिविठ्ठल अपा.दातीरमळा,दत्तनगर) व अभिषेक बाबासाहेब सोनवणे (१९ रा.कारगिल चौक,दत्तनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सातपूर औद्योगीक वसाहतीतील लालजी मुलजी ट्रान्सपोर्ट कंपनी येथे गेल्या रविवारी (दि.१८) रात्री ही चोरी झाली होती. अज्ञात चोरट्यांनी ट्रान्सपोर्ट कंपनीचे प्लॉट नं. ए १५ येथील गोडावूनचा पत्रा उचकडून कॉपर धातूचे ब्लॉक (रॉड) व कॉपर धातूचे आठ बॉक्स (कॉपर ट्यूब) असा सुमारे ९ लाख ४४ हजार ३१७ रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता.
याप्रकरणी ट्रान्सपोर्टचे व्यवस्थापक मंगेश बकरे यांनी फिर्याद दिल्याने सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शोध पथकाचे संभाजी जाधव व अनंता महाले यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे अंबड, अंबड लिंकरोड, दत्तनगर, दातीर मळा व कारगील चौक आदी भागात शोध घेवून भामट्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून त्यांच्या ताब्यातून ६ लाख ९२ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक राजू पठाण,उपनिरीक्षक प्रकाश कातकाडे,हवालदार अनिल आहेर,खरपडे,गायकवाड,सुनिल लोहरे,गिते,अंमलदार संभाजी जाधव,अनंता महाले,रामनाथ पाटील,रोहिदास कनोजे,सागर गुंजाळ,भुषण शेजवळ,गायकवाड,मोहन भोये,सचिन अजबे आदींच्या पथकाने केली.