इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
गडचिरोली पोलिसांनी विविध हिंसक कारवायांमध्ये सहभागी असलेल्या नक्षलवादी महिलेला गजाआड केले आहे. अटक केलेल्या महिलेचे नाव राजेश्वरी उर्फ कमला पाडगा गोटा, असे आहे. ती छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातल्या बडा काकलेर इथली रहिवासी आहे.
या नक्षलवादी महिलेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, छत्तीसगड राज्यातील विविध ठिकाणी तसेच गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील केडमारा येथे २०२३ मध्ये झालेल्या चकमकीत तिचा प्रत्यक्ष सहभाग होता. महाराष्ट्र शासनाने तिच्यावर ६ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
राजेश्वरी गोटा ही २००६ मध्ये नक्षल्यांच्या चेतना नाट्य मंचमध्ये पहिल्यांदा सहभागी झाली. त्यानंतर ती उपकमांडर झाली. पुढे छत्तीसगडमधील फरसेगड दलममध्ये ती कार्यरत राहिली. २०१९ मध्ये तिला अटक करण्यात आली होती. २०२० मध्ये सुटका झाल्यानंतर ती दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीत एरिया कमिटी मेंबर म्हणून कार्यरत होती.