इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लातूर : वाढदिवस हा सर्वांसाठीच आनंद सोहळा असतो आजच्या आधुनिक काळात वाढदिवस साजरा करणे म्हणजे जणू काही पर्वणीच असते, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने वाढदिवस साजरा करतो, लहान मुलांचे वाढदिवस मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरे होतात, तसेच तरुण-तरुणी, स्त्री – पुरुष इतकेच नव्हे तर ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवसही साजरे करण्याची आजच्या काळात मोठी पद्धत निर्माण झाली आहे, परंतु वाढदिवस साजरा करताना एखाद्या वेळेस दुर्घटना घडली तर निश्चितच वाईट गोष्ट म्हणावी लागेल. लातूर शहरातील असेच एक दुर्घटना घडली. वाढदिवसासाठी गेलेल्या मुलाचा उंच इमारतीवरून पडून मृत्यू झाला, या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
त्याने उपचारादरम्यान घेतला अखेराचा श्वास
लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील बिटरगावचा रहिवासी राज ऊर्फ जगदीश महादेव साखरे (वय १६ ) लातुर शहरातील लक्ष्मी कॉलनी परिसरातील एका नातेवाईकाकडे वाढदिवसानिमित्त गेला होता. राज उर्फ जगदीश हा अन्य एका मुलासोबत अपार्टमेन्टच्या तिसऱ्या मजल्यावर सांयकाळच्या सुमारास खेळत होता. मात्र खेळत असताना अनावधानाने तोल जाऊन तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने जगदीश हा गंभीर जखमी झाला. त्याला नातेवाईकांनी तातडीने लतुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचरादरम्यान त्याने अखेरचा श्वास घेतला
आनंदाच्या क्षणी दुःखाचा कोसळला डोंगर
नातेवाईकाकडे वाढदिवसानिमित्त गेलेल्या १६ वर्षीय मुलाचा अपार्टमेन्टच्या तिसऱ्या मजल्यावर खेळताना खाली पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत शासकिय रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र या दुर्घटनेमुळे नातेवाईकांच्या वाढदिवसाच्या आनंदावर विरजण पडले असून सर्वच कुटुंब आणि नातेवाईकांवर दुःखाची छाया पसरली आहे.