नाशिकरोड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान पदावर मोदीजी विराजमान होण्याअगोदर काँग्रेसच्या बासष्ट वर्षांच्या कालखंडात शेवटी म्हणजेच सन २००९ सालापर्यंत केंद्राकडून राज्याला अवघ्या हजार कोटींच्या आत निधी मिळत होता. अवघ्या नऊ वर्षात पंतप्रधान मोदींनी हा आकडा तब्बल साडे पाच हजार कोटी इतक्या उच्चांकावर नेला असल्याचे सांगत रेल्वेच्या प्रकल्पासाठी आवश्यक असणारे इन्फ्राट्रक्चर नाशिक येथे उपलब्ध असून पुढील काळात अजूनही काही महत्त्वाचे प्रकल्प नासिक येथे येणार असल्याचे संकेत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले आहे.
खासदार हेमंत गोडसे यांच्या सततच्या पाठपुराव्यातून उभारलेल्या रेल्वे व्हिल कारखान्याच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना नामदार दानवे यांनी वरील माहिती दिली.याप्रसंगी व्यासपीठावर खा.गोडसे,भाजपाचे ज्येष्ठ नेते, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी,जिल्हाध्यक्ष सुनिल आडके, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गणेश कदम,शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रविण तिदमे, आयमाचे धनंजय बेळे, नगरसेविका जयश्री खर्जुल, नितीनदादा खर्जुल,शिवाजी गांगुर्डे, आर.डी.धोंगडे, पंडित आवारे, बाजीराव भागवत, हरिष भडांगे, यांच्यासह रेल्वे प्रशासनाचे नरेशपाल सिंग,अनंत सदाशिव, इति पांडे,अलोक शर्मा,नारायण बावस्कर,नरेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी खा.गोडसे यांनी व्हिल रिपेरिंग कारखान्यासाठी केलेल्या पाठपुरावाची माहिती देत प्रस्तावित नासिक –पुणे लोहमार्गासाठी अडीच हजार कोटी,कोच रिपेरिंग कारखान्यासाठी पंचेचाळीस कोटी तर सोलापूर येथील फायरिंग रेंज नासिकरोड येथे शिफ्टिंग करणेकामी सहा कोटी रुपयांच्या निधीला केंद्राने मान्यता दिल्याचे स्पष्ट केले आहे.
पूर्वी रेल्वेबोर्ड आणि केंद्र सरकार यांचे वेगवेगळे अर्थसंकल्प सादर होत असे. रेल्वेला मिळालेल्या महसुलात केंद्र सरकार अल्पसा निधी टाकत असे. परिणामी तोकड्या निधीचे बजेट सादर होवून प्रस्तावित कामे मार्गी लागण्यास मोठा विलंब होत असे. परंतु पंतप्रधानपदी मोदी विराजमान झाल्यापासून एकच अर्थसंकल्प सादर होत आहे. गेल्या वर्षी सुमारे अडीच लाख कोटी रुपयांचा निधी केंद्राने बोर्डाला दिला आहे. यामुळे रेल्वे संबंधीच्या प्रकल्पांची कामे देशभरात वेगाने सुरू असल्याची माहिती नामदार दानवे यांनी दिली आहे. सन २०४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळून शंभर वर्षे पूर्ण होणार असून जगातील विकसनशील देशात भारत अव्वल क्रमांकावर येण्याच्या दृष्टीने पंतप्रधान मोदीजी अहोरात्र काम करत आहेत. परिणामी २०४७ सालापर्यंत भारत देश जगासमोर निश्चितच एक विकसनशील देश म्हणून उदयास येणार असल्याची ग्वाही ना.दानवे यांनी दिली.